मुंबई - येत्या २७ फेब्रुवारी हा मराठीतील थोर कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस असतो. हा दिवस आपण महाराष्ट्रात मराठी भाषा गौरव दिवस म्हणून साजरा करतो. आपली भाषा म्हणून आपण आहोत. भाषा आपल्या सर्वांना ओळख देते. त्यामुळे एका महान, गौरवशाली परंपरा असलेल्या मराठी भाषेचा गौरव जोरदारपणे साजरा झाला पाहिजे, राज्यात या दिवसाच्या निमित्ताने मराठीमय वातावरण निर्माण करा, असे आवाहन राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना पत्राद्वाके केले आहे.
दरवर्षी २७ फेब्रुवारीला मराठी भाषा दिन आपण साजरा करीत असतो. मराठी गौरव दिवस यापूर्वीही कॅलेंडरमध्ये होता परंतु तो दिवस धूमधडाक्यात साजरा करण्याची पद्धत मनसेने राज्यात पहिल्यांदा सुरू केली. हा दिवस आपण महाराष्ट्रात मराठी भाषा गौरव दिवस म्हणून साजरा करतो. त्यामुळे हा गौरव दिवस जोशात, त्याच दिमाखात आपल्या शहरात, गावात, प्रत्येक भागात, प्रत्येक प्रभागात, प्रत्येक विभागात जोरदार सादर व्हायला हवा, असे आवाहन राज ठाकरे यांनी पत्रातून केले आहे.
राज ठाकरे यांनी पत्रात पुढे म्हटले आहे की, आपली भाषा म्हणून आपण आहोत. भाषा आपल्या सर्वांना ओळख देते. त्यामुळे एका महान, गौरवशाली परंपरा असलेल्या मराठी भाषेचा गौरव तेवढाच जोदरापणे साजरा झाला पाहिजे. संत ज्ञानेश्वरांपासून, संत तुकाराम, शाहू, फुले, आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावकर, टिळक, अशी कितीतरी नावे आहेत ज्यांची भाषा मराठी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा ही मराठीच.. अशा या मराठी भाषेचा जयजयकार त्याच जोमाने आणि त्याच उत्तुंगतेने व्हायला हवा, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. त्यासाठी विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करा. मराठी भाषा इतक्या जोरदारपणे साजरा करा की तुमच्या भागातल्या प्रत्येक माणसाला कळायला पाहिले की आज मराठी भाषा गौरव दिवस आहे. जास्तीत जास्त लोक सहभागी होतील, सोहळा जितका भव्य करता येईल तो करा आणि त्यात मराठी भाषेचे पावित्र्य राखा, राज्यात या दिवसाच्या निमित्तामने मराठीमय वातावरण निर्माण करा, असे राज ठाकरे यांनी पत्रातून मनसे कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे.
No comments:
Post a Comment