मुंबई - मुंबई महापालिकेचा 2022 - 23 चा 45149.21 काेटी रुपयांचा अर्थसंकल्प आज पालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी स्थायी समितीला सादर केला. आतापर्यंतचा सर्वात माेठे आकारमान असलेला हा अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प गुलाबी स्वप्न दाखवणारा तसेच मुंगेरीलाल के हसिन स्वप्नासारखा असल्याची टीका विरोधी पक्षांनी केली आहे. तर सामान्यांना त्रास होणार नाही असा विचार करून महसूल कर उत्पन्नाचे स्रोत तयार केले आहेत. पालिकेने आजचा अर्थसंकल्प मुंबईच्या प्रगतीसाठी, भविष्यासाठी सादर केला आहे अशी प्रतिक्रिया सत्ताधारी शिवसेनेकडून देण्यात आली आहे.
पालिकेचे मेगा बजेट -
काेराेनाच्या काळात मंदावलेल्या मुंबईच्या विकासाला गती देणारा मुंबई महानगर पालिकेचा यंदाचा 2022-23 या वर्षीचा 45149.21 काेटी रुपयांचा अर्थसंकल्प आज पालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी स्थायी समितीला सादर केला. आतापर्यंतचा सर्वात माेठे आकारमान असलेला हा अर्थसंकल्प आहे. यात काेणतीही करवाढ नाही. मात्र अनधिकृत बांधकामावर मालमत्ता कराच्या दाेनपट इतकी दंड आकारणी करण्याबराेबर कचऱ्यावर वापरकर्ता शुल्क आकारण्यात येणार आहे. काेस्टल राेड, दर्जेदार आराेग्य सेवा आणि रस्ते, पाणी पुरवठा प्रकल्प, घनकचरा, मलनिसारण यावर भरीव तरतूद, असा निवडणूकीचा संकल्प असलेले हे मेगा बजेट ठरले आहे.
मुंगेरी लाल के हसीन सपने -
मुंगेरी लाल के हसीन सपने दाखवणारा हा अर्थसंकल्प आहे. आरोग्य, शिक्षण, पाणी, आणि रस्ते यापेक्षा कोस्टल रोडसाठी तरतूद केली आहे. गेल्या दोन ते तीन वर्षात प्रकल्प सुरु झाले पण ते पूर्ण झालेले नाही. आयुक्त नवीन आले कि नव्या घोषणा केल्या जातात. मात्र मुंबईकरांना त्याचा फायदा होत नाही. मुंबई आंतरराष्ट्रीय शहर आहे, राणीबागेचा विकास व्हायला पाहिजे. मात्र इतरही आरोग्य, शिक्षण, रस्ते इतर कामांना महत्व देण्यात आलेले नाही अशी टीका काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केली आहे.
गुलाबी स्वप्न दाखवणारा अर्थसंकल्प -
अंतर्गत निधी आणि राखीव निधीमधून ६९ टक्के निधी आले तरच अर्थसंकल्प प्रत्यक्षात येईल. दिवसळखोरीमधील अर्थसंकल्प आयुक्तांनी सादर केला आहे. हे उत्पन्न्न कुठून येणार ? याचे कोणतेही नियोजन आयुक्तांनी सादर केलेले नाही. उर्दू भवन बाधणाऱ्यांनी मराठी भाषा भवन, डब्बेवाला भवन याचे काय झाले याबाबत काहीही म्हटले नाही. घोषणांचा सुकाळ आणि हा गुलाबी स्वप्न दाखवणारा अर्थसंकल्प आहे अशी प्रतिक्रिया भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी दिली आहे. बेस्टच्या अर्थसंकल्पाला ६ हजार ८०० कोटींची अनुदान देण्याचा ठराव स्थायी समिती पंधरा दिवसापूर्वी मंजूर करते; पण या अर्थसंकल्पात केवळ ८०० कोटी देण्याचे सूतोवाच आयुक्त करतात. म्हणजे बेस्टला खड्ड्यात घालणारा हा अर्थसंकल्प आहे असे शिंदे यांनी म्हटले आहे.
जिव्हाळ्याच्या विषयांवर धीम्या गतीने काम -
कोविड काळात चांगली आरोग्य सेवा मिळाली म्हणून प्रशासनाची जबाबदारी वाढली आहे. दवाखाने हेल्थ पोस्टच्या माध्यमातून नागरिकांना आरोग्य सुविधा मिळते. त्याचे बळकटीकरण केले पाहिजे. मात्र त्याचे काम संथगतीने सुरु आहे. नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या विषयांवर धीम्या गतीने काम केले जात आहे. पालिका नवीन प्रकल्प करते, असे प्रकल्प करताना त्यामध्ये बाधित झालेल्या नागरिकांचे पुनर्वसन होणे गरजेचे आहे तरच प्रकल्प पूर्ण होऊ शकतात. हॉटेलवर कर लावल्यास त्याचा परिणाम नागरिकांवर होणार नाही याकडे लक्ष देण्याची गरज आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव यांनी दिली आहे.
चांगला अर्थसंकल्प -
आज जो अर्थसंकल्प सादर केला तो चांगला आहे. सामान्यांना त्रास होणार नाही असा विचार करून महसूल कर उत्पन्नाचे स्रोत तयार केले आहेत. पालिकेने आजचा अर्थसंकल्प मुंबईच्या प्रगतीसाठी, भविष्यासाठी सादर केला आहे. २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात भरघोस वाढ सुचवली असून ही वाढ गेल्यावर्षीच्या तुलनेत १७ टक्क्यांनी अधिक आहे. अर्थसंकल्पात शिक्षण, आरोग्य यावर भर दिला गेलाय. कोरोना काळात बिकट अवस्था असतानाही बजेटमध्ये वाढ केली आहे. मुंबईकरांनी विश्वास दाखवला, शिवसेनेला संधी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी वाढ करण्यास सुचवलं त्यानुसार अर्थसंकल्प वाढला आहे. पालिकेचा महसूल वाढेल अशी उपाययोजना केली आहे. काही स्वयंघोषित विरोधी पक्षनेत्यांना चिंता होती. शिवसेनेने जी वचननाम्यात आश्वासन दिले आहेत. ती आम्ही पूर्ण करतोय. यापुढे ही शिवसेनेला मुंबईकरांची सेवा करण्याची संधी देतील अशी अपेक्षा स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी व्यक्त केली आहे.
No comments:
Post a Comment