मुंबई - मुंबईतील नद्यांची गटारे झाली आहेत. या नद्या प्रदुषणाच्या विळख्यात आहेत. नद्यांचे प्रदुषण दूर करण्याचे पाऊल पालिकेने उचलले आहे. आता दहिसर, पोईसर, ओशिवरा आणि वालभट्ट नद्यांचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्धार पालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे. या कामासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात 200 काेटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
दहिसर नदीच्या पुनरुज्जीवन कामाकरिता कार्यादेश देण्यात आले असून सर्वेक्षण व संकल्पचित्रे बनविण्याचे काम प्रगतीपथावर आहे. पोयसर नदीच्या पुनरुज्जीवन कामासाठी निविदा काढल्या आहेत. वालभट आणि ओशिवरा नदीच्या पुनरुज्जीवन कामाकरिता स्थायी समितीची मान्यता मिळाली असली तरी सदर बाब न्यायप्रविष्ट असल्याने कार्यादेश अद्यापपर्यंत दिले नसल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. कार्यादेश मिळाल्यास या नद्यांच्या पूनरूज्जीवनाच्या कामाला सुरूवात हाेणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
नदी नाल्यांची सफाई
नद्यांचे पूनरूज्जीवन करण्याचा भाग म्हणून नदी नाल्यांमधील गाळ काढण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. पावसाळ्यापूर्वी नदी नाल्यांमधील गाळ काढण्यात येणार आहे. यंदाच्या पावसाळ्यापूर्वी माेठ्या नाल्यांमधील गाळ काढण्यासाठी ८० काेटी रुपये, छोट्या नाल्यांमधील गाल काढण्यासाठी ११० काेटी तर मिठी नदीमधून गाळ काढण्यासाठी ४६ कोटी इतकी तरतुद करण्यात आली आहे.
मिठी नदीवर विशेष लक्ष -
मिठी नदीच्या रुंदीकरणाचे आणि खाे्लीकरणाचे काम ९५ टक्के पूर्ण झाले असून संरक्षक भिंत बांधण्याचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे मिठीची धारण क्षमता दुप्पटीने आणि वहन क्षमता तीन पटीने वाढली आहे. मिठी नदीच्या विकासाचा आणि नदीतील प्रदुषण आराखडा तयार करण्यात आला असून त्याची अंमलबजावणी चार पॅकेजमध्ये करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात मलनिसारण वाहिन्या, सर्व्हिस राेडचे बांधण्याचे काम तसेच मलजल प्रक्रिया केंद्राचे बांधकाम या कामांसाठी १३३ काेटी खर्च करण्याची तरतूद पॅकेज एकमध्ये करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment