मुंबई - गोवंडीच्या शिवाजीनगरमध्ये एका खासगी नर्सिंग होममध्ये चुकीचे इंजेक्शन दिल्यामुळे दोन वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ताह आजम खानअसे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव असून याप्रकरणी पोलिसांनी डॉक्टर, नर्सिंग होम मालकावसह चौघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. याआधी डिसेंबर महिन्यातही या परिसरात अशाच प्रकारे एका महिलेचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले होते. (Two-year-old boy dies in Govandi due to wrong injection)
गोवंडीच्या बैंगनवाडी परिसरातील ताह खान याला उलट्या, जुलाबांचा त्रास होत असल्यामुळे त्याच्या आईवडिलांनी नूर रुग्णालयमध्ये १२ जानेवारीला दाखल केले. दुसऱ्या दिवशी त्याच्या प्रकृतीमध्ये चांगली सुधारणाही झाली. त्याच रुग्णालयात एक १६ वर्षांचा रुग्ण उपचारासाठी दाखल झाला आणि डॉक्टरांनी त्याला औषधे आणि इंजेक्शन कुठले द्यायचे हे निवासी वैद्यकीय अधिकाऱ्याला लिहून दिले. या अधिकाऱ्याने नर्सला हे इंजेक्शन देण्यासाठी सांगितले. मात्र हे इंजेक्शन देण्यावरून दोन नर्समध्ये वाद झाला. यावेळी एका नर्सने सफाई काम करणाऱ्या मुलीला इंजेक्शन देण्यासाठी सांगितले. या मुलीने १६ वर्षांच्या रुग्णाला इंजेक्शन देण्याऐवजी दोन वर्षांच्या ताह याला दिले. एक इंजेक्शन सलाइनमधून दिले तर दुसरे थेट टोचले. काही वेळातच ताह याचा मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे लहानग्या ताह याला नर्सिंग होमधील १७ वर्षांच्या सफाई काम करणाऱ्या मुलीने इंजेक्शन दिले होते. याप्रकरणी पोलिसांनी डॉक्टर, नर्सिंग होम मालकासह चौघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
No comments:
Post a Comment