मुंबई - राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सध्या लॉकडाऊन लावण्याचा विचार नाही. पण कडक निर्बंध लावण्यात येणार आहे, असे म्हटले. ऑक्सिजनची गरज 700 मेट्रिक टनहून अधिक लागल्यास राज्यात ऑटोमोडमध्ये लॉकडाऊन लागेल, असे राजेश टोपे यांनी स्पष्ट सांगितले. (The state will have a lockdown in automode)
मेट्रो सिटीसाठी निर्णय -
राज्यात कोरोना रुग्ण वाढत असताना लॉकडाऊन लावला जाणार अशी चर्चा आहे. त्याअनुषंगाने आरोग्यमंत्री बोलत होते. यावेळी बोलताना सध्या लॉकडाऊनचा कोणताही विचार नाही. लॉकडाऊनची भीती बाळगू नये. पण रुग्ण संख्या आटोक्यात न आल्यास निर्बंध आणखी कडक होऊ शकतात, असे टोपे यांनी स्पष्ट केले. आताच निर्बंध लावले आहेत त्यामुळे काही दिवसांनी त्याचा परिणाम दिसेल. सर्वांनी कोरोना नियमांचे आणि निर्बंधाचे पालन करणे गरजेचे आहे. हे सर्वांसमोरील एक आव्हान असेल. रुग्णांची संख्या वाढू नये, तसेच संसर्गावर आळा घालण्याला आमचे प्राधान्य आहे. मुंबईतील रुग्ण संख्या वाढण्याचा दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट 10 च्या आसपास गेला आहे. मुंबई, पुण्यासारख्या मेट्रो सिटीमध्ये अनेक निर्णय घेतले जाऊ शकतात.
एसजीन चाचण्या -
राज्यात आणि विशेष करून मेट्रो सिटीमध्ये रुग्णांची संख्या अधिक आहे. कोरोनाच्या डेल्टा आणि ओमायक्रॉन व्हेरियंटचा प्रसार असल्याने नेमक्या कोणत्या व्हेरियंटची लागण झालेला रुग्ण आहे त्याच्यावर त्यानुसार तातडीने उपचार करता यावेत यासाठी एस जीन चाचण्या करण्यास सांगण्यात आले आहे. एस जीन किट द्वारे आरटीपीसीआर लॅबमध्ये चाचण्या केल्या जाऊ शकतात. त्यामुळे जिनोम सिक्वेन्सिंग प्रयोगशाळेची आवश्यकता नाही. तरीही जिनोम सिक्वेन्सिंग प्रयोगशाळा प्रत्येक जिल्ह्यात असली पाहिजे असे आरोग्य मंत्री म्हणाले.
No comments:
Post a Comment