जळगाव - आंघोळीकरिता पाणी गरम करण्यासाठी लावलेल्या हीटरचा शॉक लागून नवविवाहितेचा मृत्यू झाला. सात महिन्यांपूर्वीच तिचा विवाह झाला होता. रविवारी सकाळी नऊ वाजता जळगावातील वाल्मिक नगर परिसरात ही घटना घडली. अश्विनी रोहित सपकाळे (वय २२, रा. वाल्मिकनगर) असे मृत महिलेचे नाव आहे.
अश्विनी यांचे लग्न सात महिन्यांपूर्वीच रोहित सपकाळे या तरुणासोबत झाले होते. आज रविवारी सकाळी आठ वाजता अश्विनी यांनी पतीसह संपूर्ण कुटुंबीयांसाठी जेवण केले. पती रोहित यांची मावशी आजारी असल्यामुळे त्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल होत्या. यासाठी रोहित व त्याची आई दोघे जण दुचाकीने डबा देण्यासाठी रुग्णालयात आले. रोहितचे वडील व लहान भाऊ घराबाहेर होते. यावेळी घरात एकट्या असलेल्या अश्विनी यांनी हिटर सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हिटरमध्ये विद्युतप्रवाह उतरलेला असल्याने त्यांना धक्का बसला. त्यांच्या आवाजाने शेजारच्यांनी सपकाळे यांच्या घरात धाव घेतली. यावेळी अश्विनी ह्या हिटरच्या बाजूला निपचित पडलेल्या होत्या.
नागरिकांनी त्यांना तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करुन त्यांना मृत घोषित केले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे सपकाळे कुटुंबीयांना प्रचंड धक्का बसला. पत्नीचा मृतदेह पाहून रोहित याला देखील दुख: अनावर झाले होते. त्याचे अवसान गळाले. अश्विनीचे माहेर दापोरा येथील असल्यामुळे अवघ्या तासाभरात माहेरचे लोक देखील रुग्णालयात दाखल झाले होते. नुकतेच लग्न झालेल्या मुलीचा मृतदेह पाहून माहेरच्या लोकांना अश्रू अनावर झाले होते. यानंतर दुपारी शवविच्छेदन करुन मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.
No comments:
Post a Comment