मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिका कर्मचा-यांच्या सुखदुःखात आर्थिकदृष्ट्या त्यांच्या पाठीशी उभ्या राहणा-या आणि अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या `दि म्युनिसिपल को.ऑप.बँक लिमिटेड, मुंबई` या महापालिका कर्मचा-यांच्या बँकेद्वारे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला रुपये १५ लाखांची देणगी देण्यात येत आहे. या अनुषंगाने बँकेच्या संचालक मंडळाद्वारे रुपये १५ लाखांची ‘पे ऑर्डर’ आज महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांना सुपूर्द करण्यात आली आहे. याप्रसंगी बँकेचे कार्याध्यक्ष तथा उप आयुक्त विश्वास शंकरवार, उप कार्याध्यक्ष तथा उप आयुक्त रमाकांत बिरादार यांच्यासह बँकेच्या संचालक मंडळातील मान्यवर सदस्य आणि संबंधीत अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
बँकिंग क्षेत्रातील `बँकिंग फ्रंटीअर्स' यासारख्या विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आलेली बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचा-यांची दि म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक लि. ही बँक महाराष्ट्रातील सहकारी बँकांमध्ये कर्मचारी गटातील सर्वांत मोठ्या बँकांपैकी एक बँक आहे. या बँकेचे सुमारे ८० हजारांपेक्षा अधिक सभासद असून सुमारे १० हजार इतके नामधारी सभासद आहेत. ही बँक महानगरपालिकेच्या कर्मचा-यांच्या सर्वागीण आर्थिक गरजा भागविण्यासाठी कार्यरत आहे. या बँकेद्वारे महापालिका कर्मचा-यांना कर्ज सुविधा, तर नागरिकांना विविध स्तरीय बँकींग सुविधा अत्यंत उत्तमरित्या देण्यात येतात.
महापालिका कर्मचा-यांच्या या सहकारी बँकेद्वारे ऑनलाईन बँकींग, कोअर बँकींग, आर.टी.जी.एस., एन.इ.एफ.टी., पॉस इत्यादी सुविधा देखील ग्राहकांना देण्यात येतात. ही बँक रुपे कार्डसची सभासद असून बँकेचे मुंबई व उपनगरात विविध ठिकाणी स्वतःची ए.टी.एम. केंद्रे आहेत. बँकेने मोबाईल पेमेंट सेवा देखील सुरू केली आहे. तसेच या बँकेने एखाद्या खासगी बँकेसारखीच अद्ययावत टेक्नॉलॉजीवर आधारित बँकींग सेवा आपल्या ग्राहकांना उपलब्ध करुन दिली असल्याचे बँकेचे असल्याचे महाव्यवस्थापक विनोद रावदका यांनी या निमित्ताने सांगितले आहे. तसेच उत्कृष्ट नियोजन आणि कर्ज वसुलीसाठी केलेला सततचा पाठपुरावा यामुळे ग्रॉस एन.पी.ए. चे प्रमाण देखील अत्यंत कमी असल्याचेही रावदका यांनी या निमित्ताने नमूद केले आहे.
No comments:
Post a Comment