लहान बालकाचा मृत्यू - नायरमधील डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 December 2021

लहान बालकाचा मृत्यू - नायरमधील डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी



मुंबई  - वरळीतील सिलेंडर स्फोटात होरपळून गंभीर जखमी झालेल्या चिमुकलीचा मृत्यू नायर रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचे समोर आले आहे. या संताप आणणा-या घटनेविरोधात शुक्रवारी स्थायी समितीत सर्वपक्षीय तीव्र पडसाद उमटले. सभागृहनेत्या विशाखा राऊत यांनी डॉक्टरांच्या हलगर्जीपणाच्या निषेधार्थ झटपट सभा तहकूबी मांडली. त्याला सर्वपक्षीय सदस्यांनी पाठिंबा देत निष्काळजी करणा-या त्या डॉक्टरांवर गुन्हा दाखल करून त्यांची मेडिकल डिग्री रद्द करावी तसेच मृताच्या कुटुंबीयाला २५ लाख रुपयाची नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी केली. दरम्यान या प्रकरणी संबंधित डॉक्टरांना निलंबित करण्यात आले असून नियुक्त करण्यात आलेल्या समितीची चैौकशी सुरु करण्यात आली आहे. येत्या ८ दिवसांत समिती अहवाल सादर करणार आहे. समितीच्या अहवालानुसार कारवाई केली जाईल असे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी स्पष्ट केले. 

वरळीतील गणपतराव जाधव मार्गावरील कामगार वसाहतीत बीडीडी चाळीतील एका खोलीमध्ये मंगळवारी, ३० नोव्हेंबर रोजी सकाळी गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. यामध्ये सहा महिने वय असलेल्या एका तान्ह्या बाळासह पाच वर्षे वयाचा मुलगा, एक महिला आणि एक पुरुष असे चौघेजण भाजले होते. या चारही रुग्णांना नायर रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र यावेळी तात्काळ उपचार न करता डॉक्टरांचा हलगर्जीपणा करण्यात आला. लहान चिमुकल्यासह जखमी तडफडत असतानाही त्यांच्यावर  साधे सोफ्रा मायसीनही लावण्याची तसदी संबंधित डॉक्टर, नर्स यांनी घेतली नसल्याचे वायरल झालेल्या व्हिडीओमधून समोर आले आहे. सुरुवातीच्या एक तासापेक्षा जास्त वेळ (गोल्डन अवर) डॉक्टरांनी कोणतेही उपचार न केल्यामुळे जखमीतील छोट्या बालकाचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या निष्काळजीपणाचा सर्व स्तरावर संताप व्यक्त केला जातो आहे.  शुक्रवारी स्थायी समितीत या घटनेचे पडसाद उमटले. सभागृहनेत्या विशाखा राऊत यांनी या घटनेच्या निषेधार्थ झटपट सभा तहकूबी मांडली. त्याला सर्वपक्षीय सदस्यांनी पाठिंबा दिला. सबंधित हलगर्जीपणा करणा-या डॉक्टरांवर गुन्हा दाखल करून त्यांची मेडिकल डिग्री रद्द करण्याची मागणी करण्यात आली. तसेच मृताच्या कुटुंबीयांना २५ लाखाची नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणीही  करण्यात आली. आरोग्य विभागाचा बजेट साडेतीन हजार कोटीहून अधिक आहे. मात्र तरीही असा निष्काळजीपणाच्या घटना घडत आहेत. त्यामुळे फक्त निलंबनाची कारवाई करून चालणार नाही तर कठोरात कठोर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केली. तर  या घटनेचा व्हायरल झालेला व्हिडिओ बघण्याचीही कोणाची हिम्मत होत नाही.  मान शरमेने खाली जाईल अशी घटना आहे. अत्यावश्यक विभागात रुग्णांना आणले असतानाही ४५ मिनीटे काहीही उपचार झाले नाहीत. त्यांच्याकडे कोणीही पाहिलं नाही, हे संताप आणणारे आहे. बाळ, वडील वेदनांनी तडफडत असताना काहीही उपचार झाले नाही, यांना डॉक्टर कशासाठी म्हणायचे असा सवाल करीत संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे व मृताच्या कुटुंबाला २५ लाख रुपयाची आर्थिक मदत व्हायला हवी अशी मागणी भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली. आरोग्य समिती अध्यक्ष व स्थायी समिती सदस्य राजूल पटेल, भाजपचे सदस्य भालचंद्र शिरसाट, राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव आदी सदस्यांनी संताप व्यक्त करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी या घटनेच्या निषेधार्थ झटपट सभा तहकूब केल्याचे जाहिर केले. 

समितीचा चौकशी अहवाल ८ दिवसांत -
या घटनेची चौकशी करण्यासाठी त्री सदस्यीस समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीतील दोन सदस्य पालिका प्रशासनाच्या बाहेरच्या आहेत. त्यामुळे  चैौकशी निष्पक्ष होईल. समितीचा अहवाल येत्या आठ दिवसात सादर केला जाणार आहे. समितीच्या शिफारशी मान्य केल्या जाणार असून त्यानुसार कारवाई केली जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. 


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad