मुंबई - विविध खेळांमध्ये प्राविण्य मिळवलेल्या होतकरू खेळाडूंना खेळादरम्यान दुखापत झाल्यास बिकट आर्थिक परिस्थितीमुळे खासगी रुग्णालयातील महागडे उपचार परवडत नाहीत. त्यामुळे अशा काही खेळाडूंना आपला खेळ अर्धवट सोडावा लागतो. त्यामुळे त्यांची क्रीडा कारकीर्द संपुष्टात येते. त्यामुळे या खेळाडुंवर प्राधान्याने उपचार करण्याचा निर्णय केईएम रुग्णालयाने घेतला आहे. या निर्णयामुळे खेळादरम्यान जखमी होणाऱ्या खेळाडूंना मोठा आधार मिळणार आहे. पालिकेतील एका ठरावावर केईएम प्रशासनाने हे उत्तर दिले आहे.
मुंबईत क्रिकेट, फुटबॉल, खो-खो, कबड्डी यासह विविध खेळांच्या स्पर्धा विविध संस्थांमार्फत आयोजित करण्यात येतात. लालबाग, परळ, काळाचौकी यासह पूर्व-पश्चिम उपनगरात अनेक खासगी, व्यावसायिक व्यायामशाळांमध्ये नवे खेळाडू घडवले जातात. मुंबई शहराने देशाला अनेक नामवंत खेळाडू दिले आहेत. काही खेळाडूंनी विविध खेळांमध्ये प्राविण्य मिळवले. मात्र खेळादरम्यान झालेल्या जबर दुखापतीमुळे ते जायबंदी झाले. दुखापतीवरील काही उपचार खूपच महागडे असतात. दुखापत झालेल्या अशा खेळाडूंवर महापालिका रुग्णालयात मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी ठरावाची सूचना २०१९ मध्ये शिवसेनेचे नगरसेवक समाधान सरवणकर यांनी पालिका सभागृहात केली होती. ती एकमताने मंजूर झाली होती. या ठरावावर केईएम रुग्णालय प्रशासनाने आपला लेखी अभिप्राय दिला आहे.
केईएममध्ये रुग्णांवर कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करतात तातडीने औषधोपचार करण्यात येतात. आर्थिकदृष्ट्या गरीब रुग्णांना वैद्यकीय समाजसेवक व 'पीबीसीएफ'मार्फत मोफत उपचार देखील करण्यात येतात. मुंबई शहरातील विविध खेळांमध्ये प्राविण्य मिळवलेल्या होतकरू खेळाडूंना खेळादरम्यान दुखापत झाली व त्याची माहिती रुग्णालय प्रशासनाला उपलब्ध झाल्यास त्याबाबत सकारात्मक विचार करून त्यांच्यावर उपचार करणे शक्य असल्याचे रुग्णालय प्रशासनाने या अभिप्रायात म्हटले आहे.
No comments:
Post a Comment