नाताळ साजरा करण्यासंदर्भात गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 December 2021

नाताळ साजरा करण्यासंदर्भात गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी



मुंबई, दि.24 : नाताळ सणानिमित्त ख्रिश्चन बांधवांनी आरोग्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात एकत्र न येता या वर्षी देखील नाताळचा सण पूर्णत: खबरदारी घेऊन साध्या पध्दतीने साजरा करण्यासंदर्भात शासनाच्या गृह विभागाने मार्गदर्शक सूचना (Home Department issues guidelines for Christmas) जारी केल्या आहेत. कोरोना विषाणूच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये "ओमिक्रॉन" ही नवीन विषाणू प्रजाती आढळून आल्यामुळे संसर्गाचा नवीन धोका निर्माण झाला आहे. या ओमिक्रॉन विषाणू प्रजातीचे संक्रमण सामान्य नागरिकांमध्ये/रहिवाशांमध्ये फार मोठ्या तीव्रतेने पसरण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर गृह विभागाने मार्गदर्शक सूचनांचे परिपत्रक निर्गमित केले आहे.

या परिपत्रकानुसार कोवीड- 19 च्या अनुषंगाने राज्य शासनाने दिलेल्या सुधारीत मार्गदर्शक सुचनांचे तंतोतंत पालन करणे अत्यावश्यक आहे. नाताळ / ख्रिसमस निमित्ताने चर्चमध्ये उपलब्ध आसनक्षमतेच्या 50 टक्के पर्यंत लोकांना उपस्थित राहण्यास परवानगी असेल. चर्चमध्ये कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही व सामाजिक अंतर (Social Distancing) राखले जाईल तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच चर्चमध्ये निर्जंतूकीकरणाची व्यवस्था करण्यात यावी. नाताळच्या दिवशी चर्चमध्ये प्रभू येशूच्या जीवनावरील देखावे. ख्रिसमस ट्री अगर काही वस्तू ठेवल्या जातात. त्या ठिकाणी सामाजिक अंतर व स्वच्छतेचे नियम पाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात. चर्चमध्ये प्रभु येशू ख्रिस्त यांचे स्तुतीगीत (Choir) गाण्यासाठी कमीत कमी गायकांचा (Choiristers) समावेश करण्यात यावा. त्यावेळी वेगवेगळ्या माईकचा वापर करून सामाजिक अंतराचे पालन करण्यात यावे. चर्चच्या बाहेर/ परिसरात दुकाने अगर स्टॉल लावू नयेत. सार्वजनिक ठिकाणी अगर रस्त्यावर मोठ्या संख्येने एकत्र येणे अथवा गर्दी करणे टाळावे. कोणत्याही प्रकारे गर्दी आकर्षित होईल अशा धार्मिक/सांस्कृतिक कार्यक्रमाचे अथवा मिरवणूकांचे आयोजन करण्यात येऊ नये. फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येऊ नये, ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे व तरतूदींचे काटकोर पालन करण्यात यावे.

कोविड- 19 व विशेषत्वाने ओमिक्रॉन या विषाणू प्रजातीचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या नगरविकास विभाग, मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगर पालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष नाताळ उत्सव सुरू होण्याच्या मधल्या कालावधीत काही सूचना नव्याने प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे.असे परिपत्रक गृह विभागाने निर्गमित केले असून हे शासन परिपत्रक शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad