मुंबई - महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर देशभरातून अनुयायी दाखल झाले आहेत. दरवर्षी दादरच्या चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने जनसागर उसळतो. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा गर्दी न करता कोरोनाचे नियम पाळून बाबासाहेबांना अभिवादन करा असे आवाहन प्रशासनाने केले आहे. त्यासाठी खबरदारी घेण्यात आली आहे. गर्दी टाळण्यासाठी थेट प्रक्षेपण उपलब्ध करण्यात आले आहे. चैत्यभूमीवर अभिवादनासाठी येणा-यांची कोरोना चाचणी केली जाते आहे. कोरोना प्रतिबंधित लसीकरणही केले जाते आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करण्यासाठी दरवर्षी जनसागर लोटतो. कोरोनाच्या संकटामुळे मागील वर्षी निर्बंध असल्याने मोजक्याच लोकांच्या उपस्थित येथे कार्यक्रम पार पडला. यावेळी थेट प्रक्षेपण उपलब्ध करण्यात आले होते. यंदा मात्र कोरोनाचे नियम पाळून गर्दी न करता अभिवादन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपणही उपलब्ध करण्यात आले आहे. त्यामुळे रविवारी सकाळपासूनच बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्य़भूमीच्या दिशेने अनुयायी दाखल झाले. सोमवारी, ६ डिसेंबरला गर्दी वाढण्याची शक्यता असल्याने बॅरेकेट्स लावून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गर्दी करू नका, सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळा असे आवाहन केले जाते आहे. मुंबई महापालिकेनेही सर्व सुविधा, सेवा उपलब्ध केल्या आहेत. विविध स्टॉल लावू नयेत यासाठी पालिकेने आवाहन केले होते, त्य़ाला लोकांनी प्रतिसाद देत स्टॉल व मंडप उभारणे टाळले आहे. येथे येणा-यांची अँटिजेन व आरटीपीसीआर चाचणी केली जाते आहे. तसेच लसीकरण मोहिमही राबवली जाते आहे. दादर रेल्वे स्थानक ते चैत्यभूमी - शिवाजी पार्ककडे जाणा-या रस्त्यावरील फेरीवाल्यांना उठवण्यात आले आहे. त्यामुळे रस्ते मोकळे झाले आहेत. अभिवादनासाठी येणा-यांना शिस्तीने जाता येईल अशी सोय प्रशासनाने केली आहे. गर्दी होऊ नये यासाठी बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टनसिंग राहिल याची खबरदारी घेतली जाते आहे. तसे स्वयंसेवकांकडून आवाहन करण्यात येते आहे.
लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच रेल्वे व बेस्टने प्रवासाची मुभा असल्याने तपासणीही वाढवण्यात आली आहे. रेल्वे स्थानक व परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. कोरोनाचे नियम पाळून प्रवास करा असे रेल्वे प्रशासनानेही आवाहन केले आहे.
चाळी, वसाहतीत अभिवादन कार्यक्रम
कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. त्यामुळे महामानवाला घरबसल्या अभिवादन करता येणार आहे. कोरोनाचे नियम पाळून बाबासाहेबांच्या विचारांवर भीमगीते, जलसा, विचारमंथनाचे कार्यक्रम सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळत चैत्यभूमीसह चाळी, वसाहतीत आयोजित करण्यात आले आहेत. बाबासाहेबांच्या राजगृह निवासस्थान, चेंबूर येथील आंबेडकर उद्यान परिसर, अनेक वसाहतींतून तसेच समाज माध्यमांवर बाबासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत.
No comments:
Post a Comment