कोविड प्रतिबंधात्मक नियम पाळा, अन्यथा सक्त कारवाई - महापालिका आयुक्त - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 December 2021

कोविड प्रतिबंधात्मक नियम पाळा, अन्यथा सक्त कारवाई - महापालिका आयुक्त



मुंबई - कोविड - १९ विषाणूचा ओमायक्रॉन हा नवीन प्रकार जगभरात वेगाने फैलावत असून त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण निर्माण होऊ लागला आहे. कोविडची तिसरी लाट येऊ नये म्हणून शासन आणि प्रशासन वारंवार आवाहन करित असतानाही त्याचे बहुतांश ठिकाणी योग्यरित्या पालन केले जात नसल्याचे निदर्शनास येत आहे. विशेषतः लग्न समारंभ आणि इतर समारंभांमध्ये नियम मोडले जात असल्याचे आढळते आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी शासनाने आखून दिलेल्या मर्यादांचे योग्य पालन करावे, कोणत्याही प्रकारची गर्दी टाळावी, मास्क लावण्यासह कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे, प्रत्येकाने लसीकरण पूर्ण करुन घ्यावे, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी जनतेला केले आहे. दरम्यान, नियमांची पायमल्ली करणाऱयांवर महानगरपालिकेच्या विभाग कार्यालय स्तरावरील पथकांकडून तसेच पोलीस प्रशासनाकडून सक्त कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले आहे. 

महानगरपालिका आयुक्त डॉ. चहल यांनी म्हटले आहे की, सर्व जनतेचे सहकार्य, काटेकोरपणे केलेले कोविड व्यवस्थापन आणि कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेला दिलेला वेग यामुळे मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोविड संसर्ग परिस्थिती आज संपूर्णपणे नियंत्रणात आहे. मात्र, ओमायक्रॉन या नवीन विषाणू प्रकारामुळे जगातील अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा परिस्थिती हाताबाहेर गेली असून टाळेबंदीची परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतात तसेच महाराष्ट्रात अशी स्थिती उद्भवू नये म्हणून अनुक्रमे केंद्र व राज्य सरकारच्या वतीने जनतेला सातत्याने आवाहन करुन खबरदारी घेण्याची विनंती करण्यात येत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने देखील मुंबईकरांना दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे. मात्र, त्याला पुरेसा प्रतिसाद मिळालेला नाही. विशेषतः लग्न समारंभ आणि इतर समारंभांचे आयोजन करताना नियमांची पायमल्ली करुन गर्दी केली जात आहे. समाजावर प्रभाव असणाऱया नामांकित व्यक्ती, प्रतिष्ठित नागरिक यांनी देखील सर्व बाबींचे भान राखणे आवश्यक आहे. कोणीही आणि कोणतेही नियम मोडलेले आढळले तर, प्रशासनाने आता पुन्हा एकदा कठोरपणे कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी नमूद केले आहे.

राज्य शासनाच्या वतीने मुख्य सचिव यांनी दिनांक २७ नोव्हेंबर २०२१ रोजी आदेश निर्गमित करुन सार्वजनिक मर्यादा आखून दिलेल्या आहेत. तसेच, नियमांचे उल्‍लंघन करणाऱयांवर भारतीय दंड विधान संहितेनुसार तसेच साथरोग व्यवस्थापन कायदा आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई करण्याबाबत मुंबई पोलीस प्रशासनाने दिनांक १४ डिसेंबर २०२१ च्या आदेशांन्वये स्पष्ट केले आहे. या दोन्ही आदेशातील सूचनांचे योग्य ते पालन होणे आवश्यक आहे. येत्या काही दिवसांमध्ये नाताळ तसेच नवीन वर्ष प्रारंभ पार्श्वभूमीवर समारंभ आणि सोहळ्यांचे आयोजन झाल्यास गर्दी होण्याचा धोका आहे. तसेच लग्न व इतर समारंभांच्या आयोजनातून वाढत असलेली गर्दी रोखणे गरजेचे झाले आहे. एवढेच नव्हे तर, हॉटेल्स आणि उपहारगृह व इतर सार्वजनिक आस्थापनांमध्ये देखील गांभीर्याने नियम पाळले जात नसल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली आहे. या पार्श्वभूमीवर नाताळ (ख्रिसमस), नवीन वर्ष स्वागतासाठी पार्ट्यांचे आयोजन करणे टाळावे, समारंभांमध्ये गर्दी करु नये, कोविड प्रतिबंधात्मक वर्तन राखावे, असे आवाहन इकबाल सिंह चहल यांनी केले आहे.

नियम पाळा, अन्यथा सक्त कारवाई -
· बंदिस्त सभागृहांमध्ये आयोजित होणारे कोणतेही कार्यक्रम / समारंभ / उपक्रम या ठिकाणी, त्या सभागृहाच्या एकूण क्षमतेच्या ५० टक्के व्यक्तिंनाच उपस्थितीची परवानगी आहे.
· मोकळ्या / खुल्या जागेत होणाऱया कार्यक्रम / समारंभ / उपक्रम यासाठी सदर जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के एवढ्याच संख्येने उपस्थितीला परवानगी असेल.
· मात्र, खुल्या / मोकळ्या जागेतील कोणत्याही आयोजनात एक हजारापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येणार असतील तर, त्या संदर्भात स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला आगावू सूचना देऊन त्याबाबतची पूर्व मंजुरी प्राप्त करणे अत्यावश्यक आहे.
· सर्व हॉटेल्स्, उपहारगृह, सिनेमागृह, इतर सर्व शासकीय व खासगी आस्थापना आदी सर्व ठिकाणी उपस्थितींच्या नियमांसह कोविड प्रतिबंधात्मक निर्देशांचे सक्तीने पालन करण्यात यावे.
· सर्व पात्र नागरिकांनी कोविड लसीचे दोन्ही डोस घेऊन आपले लसीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसह इतर सार्वजनिक ठिकाणी देखील कोविड लसीकरण पूर्ण झालेल्यांनाच योग्य ती मुभा असेल. अन्यथा नियमानुसार कारवाई केली जाईल.
· सार्वजनिक ठिकाणी / आस्थापनांमध्ये कार्यरत सर्व मनुष्यबळाचे तसेच कार्यक्रम / समारंभांमध्ये सर्व उपस्थितांचे लसीकरण पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे. त्याचे उल्‍लंघन केल्याचे आढळले तर संबंधित आस्थापनांवर नियमानुसार योग्य ती दंडात्मक कारवाई केली जाईल.
· मुखपट्टी (मास्क) चा योग्यरितीने वापर करणे, हातांची नियमित स्वच्छता राखणे आणि सुरक्षित अंतर राखणे, सर्व परिसर / खोल्या / प्रसाधनगृहे यांची वेळोवेळी स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करणे यासह कोविड प्रतिबंधक सर्व बाबींचे प्रत्येक नागरिकाकडून काटेकोर पालन करण्यात यावे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad