मुंबई - दरवर्षी 6 डिसेंबरला चैत्यभूमी येथे लाखो भीम अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करण्यासाठी येतात. कोरोनाचा प्रसार असल्याने गेले दोन वर्षे आंबेडकरी अनुयायी चैत्यभूमीला येण्यापासून वंचित राहिले आहेत. यंदाही सरकार अनुयायांना वंचित ठेवू पहात आहे. मात्र यंदा आंबेडकरी जनता काही झालं तरी चैत्यभूमीला येणारच असा इशारा बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू व रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी दिला आहे.
आंबेडकरी अनुयायी येणारच -
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. विदेशात ओमिक्रॉन विषाणूंचा फैलाव वेगाने होत आहे. गर्दी होणारे कार्यक्रम त्यामुळे आयोजित करू नये, असे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर आनंदराज आंबेडकर बोलत होते. यावेळी बोलताना, राज्यात सर्व मंदिरे खुली केली जात आहेत. शाळा सुरू केल्या जात आहेत. असे असताना फक्त आंबेडकरी अनुयायांवर बंदी का असा प्रश्न आनंदराज यांनी उपस्थित केला आहे. चैत्यभूमीला येण्यापासून आंबेडकरी अनुयायांना रोखण्याच्या प्रकाराचा मी निषेध करतो. हा प्रकार म्हणजे आंबेडकरी अनुयायांवर वैचारिक हल्ला आहे. यंदा कितीही बंदी घातली तरी आंबेडकरी अनुयायी येणारच. राज्य सरकार महापरिनिर्वाण दिन कार्यक्रमाला कोणतीही मदत करत नाही. जी काही मदत केली जाते ती मुंबई महापालिकेकडून केली जाते यामुळे राज्य सरकारने अशी बंदी घालणे चुकीचे असल्याचे आनंदराज यांनी म्हटले आहे.
सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित न करण्याचे आवाहन -
परदेशात ओमिक्रॉनचा संसर्ग फोफावला आहे. राज्य सरकारने याची धास्ती घेत, उपाययोजना हाती घेतल्या आहेत. येत्या 6 डिसेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन साजरा केला जातो. देशाच्या कानाकोपऱ्यातून अनुयायी येथे येतात. गेल्या दोन वर्षात कोरोनाचे सावट असल्यामुळे महापरिनिर्वाण दिन साधेपणाने साजरा करण्यात आला होता. आता संकट आटोक्यात येत असतानाच तिसऱ्या लाटेचा धोका वर्तवला जातो आहे. राज्य सरकार यामुळे अलर्ट मोडवर आले आहे. यंदा गेल्या वर्षीप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून गर्दी न करण्याचे आवाहन राज्य शासनाने केले आहे.
No comments:
Post a Comment