मुंबई - मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अध्यादेश जाहीर केल्यानंतर शुक्रवारी राज्य निवडणूक आयोगाकडूनही लेखी सूचना पालिकेला आल्या आहेत. त्यामुळे आठवडाभरात नव्या प्रभाग रचनेचा मसुदा तयार करून निवडणूक आयोगाला सादर करण्यात येईल, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.
राज्य मंत्रीमंडळाने ११ नोव्हेंबर रोजी मुंबईतील नगरसेवक प्रभागांची संख्या २२७ वरुन २३६ करण्यास परवानगी दिली होती. मात्र त्याबाबतचा अध्यादेश गुरुवारी २ डिसेंबरला प्रसिध्द करण्यात आला. त्यानंतर शुक्रवारी निवडणूक आयोगाकडून प्रभाग रचनेबाबत लेखी सुचना महापालिका प्रशासनाला पाठवल्या आहेत. ‘या सुचनांनुसार प्रभाग रचना करण्यात येणार असल्याचे काकाणी यांनी सांगितले.
पालिकेची मुदत ८ मार्च रोजी संपणार आहे. त्यापूर्वी नव्या नगरसेवकांसह महापौरांची निवड होणे गरजेचे आहे. पालिकेची निवडणूक साधारण:त फेब्रुवारी महिन्यात होतात. मात्र, यंदा आयत्यावेळी राज्य सरकारने प्रभागांची संख्या नऊ ने वाढविण्याचा निर्णय घेतला. त्यापुर्वी पालिकेने २२७ प्रभागांचे सिमांकन करुन त्याचा मसुदा निवडणुक आयोगाकडे पाठवला होता. मात्र,पुन्हा नव्याने पालिकेला वाढीव प्रभांगासह मसुदा तयार करावा लागणार आहे.
ईव्हीएम मशीन्समुळे निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता -
राज्यातील ४ हजार ग्रामपंचायती निवडणुका आणि मुंबई महापालिकेची निवडणूक ही फेब्रुवारी २०२२ मध्ये एकाच वेळी होण्याची शक्यता आहे. मुंबईत ११ हजार मतदार केंद्र असून तितक्याच ईव्हीएम मशीनची गरज लागणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायत व मुंबई महापालिका निवडणुका एकत्र झाल्यास ईव्हीएम मशीनची कमतरता भासू शकते. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता मुंबई महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
No comments:
Post a Comment