मुंबई - जगभरात चिंता वाढवणारा घातक ओमायक्रॉनचे मुंबईत आणखी तीन रुग्ण आढळले आहे. हे रुग्ण टांझानिया, लंडन आणि दक्षिण आफ्रिकेतून आले आहेत. या रुग्णांना गंभीर लक्षणे नाहीत मात्र खबरदारी म्हणून सेव्हनहिल्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान मुंबईतील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या आता पाचवर गेली असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागातून देण्यात आली.
मागील आठवड्यात राज्यात ओमायक्रॉनचे रुग्ण आढळल्यानंतर मुंबईतही या नव्या व्हेरियंटने शिरकाव केला आहे. गेल्या सोमवारी मुंबईत दोन रुग्ण आढळले. यातील एक रुग्ण बरा झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. त्यानंतर शुक्रवारी आणखी तीन रुग्ण आढळले आहेत. यातील टांझानियामधून ४ डिसेंबरला आलेला रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. तो मूळचा चेन्नईतला पण धारावीत राहत होता. या प्रवाशाचे वय ४८ आहे. त्याने लसीचा एकही डोस घेतलेला नाही. विमानतळावर आल्यानंतर त्याची कोरोना टेस्ट केल्यानंतर त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्यामुळे हा रुग्ण ओमायक्रॉन या नव्या व्हेरियंट विषाणूने बाधित आहे का हे तपासणीसाठी त्याचे सॅम्पल जिनोम सिक्वेंसिंगसाठी कस्तुरबा रुग्णालयात पाठवण्यात आले होते. या अहवालात हा रुग्ण ओमायक्रॉन पॉझिटीव्ह आढळला आहे.
दुसरा रुग्ण २५ वय असलेला रुग्ण लंडन येथून १ डिसेंबर रोजी मुंबईत आला होता. त्याची कोविड चाचणी बाधीत आल्याने त्याचा वैद्यकीय नमुना जनुकीय विश्लेषणासाठी पाठविण्यात आला होता. त्यात ओमायकॉन पॉझिटिव्ह आला आहे. सदर रुग्णाचे कोविड लसीचे दोन्हीही मात्रा पूर्ण झाल्या आहेत. या रुग्णाच्या निकटच्या संपर्कातील व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यापैकी कोणीही कोविड बाधित नाही. तर तिसरा ३७ वर्षीय पुरुष रुग्ण गुजरातचा रहिवासी असून तो दक्षिण आफ्रिका येथून ४ डिसेंबर रोजी आला होता. या रुग्णाची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यामुळे त्याचा नमुना जनुकीय विश्लेषणासाठी पाठविण्यात आला होता. सदर रुग्णाच्या कोविड लशीच्या दोन्हीही मात्रा पूर्ण झाल्या आहेत. सदर रुग्णाला खबरदारीची उपाययोजना म्हणून विमानतळावरूनच रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याला सौम्य लक्षणे आहेत.
आठवडाभरापूर्वी शनिवारी डोंबिवलीत ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर दुस-याच दिवशी रविवारी पिंपरी चिंचवड व पुणे येथे रुग्ण आढळले. त्यानंतर सोमवारी मुंबईत दोन रुग्ण आढळले. आता आणखी तीन रुग्ण आढळल्याने मुंबईत रुग्णांची संख्या पाचवर गेली आहे. ओमाय क्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. गेल्या काही दिवसात मुंबई विमानतळावर आलेल्या परदेशी प्रवाशांचा शोध घेऊन त्यांच्या कोरोना चाचण्या केल्या जात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
हाय रिस्क देशातून आले ५३९२ प्रवासी -
हाय रिस्क देशातून १० नोव्हेंबर ते ८ डिसेंबर दरम्यान ५३९२ प्रवासी मुंबईमध्ये आले आहेत. या सर्वांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. त्यापैकी २४ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. यात २० पुरुष तर ४ महिला प्रवासी आहे. या पॉझीटिव्ह प्रवाशांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेतला जात आहे. या सर्व पॉझिटिव्ह प्रवासी रुग्णांना रुग्णालयात भरती करण्यात आले असून त्यांचे नमुने जिनोम सिक्वेनसिंग तसेच एस जिन चाचणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.
No comments:
Post a Comment