मुंबई - मुंबईत डिसेंबर महिन्यापासून पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. डिसेंबरच्या सुरुवातीला 108 रुग्ण आढळून आले होते, त्यात वाढ होऊन आज (30 डिसेंबरला) 3671 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज आठव्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच धारावीतही रुग्णसंख्या वाढून आज 20 रुग्णांची नोंद झाली आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने मुंबईकरांचे व आरोग्य विभागाचे टेंशन वाढले आहे.
मुंबईत आज 30 डिसेंबरला 3671 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत आठ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. आज 371 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.आतापर्यंत एकूण 7 लाख 79 हजार 479 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 7 लाख 49 हजार 159 रुग्ण बरे झाले आहेत. तर 16 हजार 375 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 11 हजार 360 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96 टक्के ( corona patient recovery rate in Mumbai ) तर रुग्ण दुपटीचा कालावधी 505 दिवस इतका आहे. मुंबईमधील 88 इमारती आणि 4 झोपडपट्ट्या सील करण्यात आली आहे. 23 डिसेंबर ते 29 डिसेंबर या कालावधीत कोरोना वाढीचा दर 0.14 टक्के इतका आहे.
या दिवशी रुग्णसंख्या वाढली -
मुंबईत गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला. तेव्हापासून मुंबईत कोरोनाचा प्रसार आहे. फेब्रुवारी महिन्यात दुसरी लाट आली. एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या 11 हजारावर गेली होती. जून पासून त्यात घट होऊ लागली. 1 डिसेंबरला कोरोनाचे 108 नवे रुग्ण आढळून आले होते. 2 डिसेंबरला त्यात वाढ होऊन 228 रुग्ण आढळून आले. 4 डिसेंबरला 228, 8 डिसेंबरला 250, 11 डिसेंबरला 256, 16 डिसेंबरला 279, 17 डिसेंबरला 295, 18 डिसेंबरला 283, 19 डिसेंबरला 336, 21 डिसेंबरला 327, 22 डिसेंबरला 490, 23 डिसेंबरला 602, 24 डिसेंबरला 683, 25 डिसेंबर 757, 26 डिसेंबर 922, 27 डिसेंबरला 809, 28 डिसेंबरला 1377, 29 डिसेंबर 2510, 30 डिसेंबर 3671 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
या आठ दिवशी शून्य मृत्यूची नोंद -
मुंबईमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर गेल्या काही महिन्यात 1 ते 6 मृत्यूंची नोंद झाली होती. 17 ऑक्टोंबर 2021 रोजी शून्य मृत्युची नोंद झालेली आहे. त्यानंतर 11 डिसेंबर, 15 डिसेंबर, 18 डिसेंबर, 20 डिसेंबर, 22 डिसेंबर, 25 डिसेंबर, आणि आज 30 डिसेंबरला शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. मृत्यूची संख्या शून्य होत असल्याने कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यात पालिकेला यश येत असल्याचे दिसत आहे.
धारावीत पुन्हा रुग्ण संख्या वाढली -
मुंबईतील धारावी ही सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून प्रसिद्ध आहे. या झोपडपट्टीत दाटीवाटीने लोक राहत असल्याने गेल्यावर्षी धारावी कोरोनाची हॉटस्पॉट झाली होती. गेल्या वर्षी पाहिल्या लाटे दरम्यान धारावीत दिवसाला 70 हुन अधिक रुग्णांची नोंद झाली होती. 8 एप्रिलला दुसऱ्या लाटेत सर्वाधिक 99 रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर कोरोनाचा प्रसार आटोक्यात आल्याने धारावीत गेले काही महिने 1 ते 5 रुग्ण आढळून येत होते. कित्तेकवेळा धारावीत शून्य रुग्णांची नोंद झाली आहे. मात्र आता मुंबईत पुन्हा रुग्णसंख्या वाढल्याने धारावीतही रुग्ण वाढू लागले आहे. गेल्या 24 तासात धारावीत 20 नवे रुग्ण आढळून आले आहेत. याआधी 18 मे ला सर्वात जास्त रुग्णांची नोंद झाली होती. आज 20 नवे रुग्ण आढळून आल्याने धारावीतील एकूण रुग्णांची संख्या 7239 इतकी झाली आहे. आतापर्यंत 6761 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. धारावीत सध्या 61 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
No comments:
Post a Comment