मुंबईत गुलाबी थंडीची चाहूल - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 November 2021

मुंबईत गुलाबी थंडीची चाहूल



मुंबई - मुंबईत उन्हाची झळ संपून आता गुलाबी थंडीची चाहूल लागायला सुरुवात झाली आहे. मंगळवारी मुंबईतील तापमान तीन अंशाने घसरले आहे. सांताक्रुझ येथे मंगळवारी २०.२ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. दररोजच्या तापमानापेक्षा १.८ अंश सेल्सियसने मुंबईचे तापमान घसरले आहे. वातावरणातील गारव्यामुळे मुंबईकर सुखावले आहेत.

गेल्या आठवड्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडला. मुंबईत पावसाचा हलकासा शिडकावा झाला. मात्र यावेळी सकाळी गारवा व दुपारनंतर पुन्हा उन्हाच्य़ा झळांनी मुंबईकर घामाघूम झाले. १५ दिवसांपूर्वी हिवाळा सुरु झाला असतानाही वातावरणात उकाडा होता. त्यामुळे गुलाबी थंडीची मुंबईकरांना प्रतीक्षा होती. मंगळवारी सकाळपासून वातावरणात गारवा निर्माण होऊन थंडीची चाहूल लागायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांची प्रतीक्षा संपली आहे. मुंबईकरांनीही ठेवणीतील स्वेटर बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे. तसेच फोर्ट, परळ, फॅशन स्ट्रीट आदी बाजारातही स्वेटर घेण्यासाठी मुंबईकरांनी गर्दी केली होती.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार सोमवारी किमान २३.४ तापमानाची नोंद झाली होती. या तापमानात घट होऊन मुंबईचे तापमान २१ अंशावर येऊन पोहचले होते. मंगळवारी २०.२ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. दिवसभर वातावरणात गारवा होता. त्यामुळे थंडीचा महिना सुरु झाल्याने मुंबईकर गुलाबी थंडीचा अनुभव घेणार आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad