मुंबई - गुजरातच्या द्वारकेत साडे तीनशे कोटीचं ड्रग्ज सापडल्याने शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला घेरलेलं असतानाच आता राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. ड्रग्जचा संपूर्ण खेळ गुजरातमधून तर सुरू नाही ना? असा सवाल नवाब मलिक यांनी केला. नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन द्वारकेत सापडलेल्या ड्रग्जवरून भाजपला घेरलं आहे. द्वारकात साडेतीनशे कोटीचे ड्रग्ज पकडले आहे. मनिष भानुशाली, धवल भानुशाली, केपी गोसावी आणि सुनील पाटील हे सर्व जण अहमदाबादच्या नोवाटल आणि फाईव्ह स्टार हॉटेलात होते. गुजरातच्या मंत्र्यासोबत त्यांचे फोटो आहेत. हे लोक गुजरातमधून ड्रग्ज रॅकेट ऑपरेट करत आहेत, असं सांगतानाच ड्रग्जचा खेळ गुजरातमधून तर सुरू नाही ना? असा सवाल मलिक यांनी केला आहे.
महाराष्ट्रात दोन ग्राम ड्रग्ज पकडल्यास बॉलिवूडकरांची परेड केली जाते. पण गुजरातमध्ये सागरी मार्गाने किलोच्या किलो ड्रग्ज आणले जात आहेत. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी योग्य दिशेने व्हावी. यात कोणत्या पक्षाचा नेता आणि कार्यकर्ता आहे याकडे दुर्लक्ष करून एनसीबी आणि एनआयएने चौकशी करावी. देशाला नशामुक्त करण्यासाठीच 1950चा कायदा बनवला होता. गुजरातमधूनच सर्व खेप येत आहे. या ड्रग्जचे खिलाडी गुजरातमध्ये आहेत. त्यामुळे त्याची चौकशी करावी. गुजरात कनेक्शन काय आहे ते समोर यावं, अशी मागणी मलिक यांनी केली.
गुजरातमध्ये दुसऱ्यांदा मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज सापडलं आहे. त्यात मनिष भानुशाली, धवल भानुशाली, केपी गोसावी आणि सुनील पाटील यांचं या प्रकरणाशी काही कनेक्शन आहे का? याचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.
त्यांची संस्कृती दिसून येते -
देवेंद्र फडणवीस यांनी काल बर्नाड शॉचा सुविचार पोस्ट करून मला प्राण्याची उपमा दिली. त्यात काही नवीन नाही. भाजपचे नेते असेही लोकांना कुत्रे, मांजर म्हणत असतात. यातून त्यांची संस्कृती दिसून येते. ते लोकांना माणूस म्हणून वागवत नाहीत हेच स्पष्ट होतं, असा टोला त्यांनी फडणवीसांना लगावला.
फडणवीसांना नोटीस -
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जे विधान केलं होतं ते एका कुटुंबाची बदनामी होती. त्यामुळेच माझ्या मुलीने फडणवीस यांना नोटीस पाठवली आहे. फडणवीस यांनी या प्रकरणी माफी मागितली नाही तर क्रिमिनल आणि सिव्हिल सूट फाईल आहे. प्रत्येकाला राईट टू स्पीक आहे. पण राईट टू अब्यूस नाही. मानहानी होत आहे. त्यामुळेच मुलीने नोटीस पाठवली असून त्यांनी माफी नाही मागितली तर मानहानीचा दावा करणार आहोत, असं त्यांनी सांगितलं.
No comments:
Post a Comment