मुंबई दि. १९ नोव्हेंबर - झालेली चूक सुधारत केंद्रसरकारने शेतकरीविरोधी असलेले कृषी कायदे मागे घेत असल्याची घोषणा आज सकाळी केली. लोकशाहीसमोर आज हुकूमशाही अखेर झुकली अशी प्रतिक्रिया देत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी शेतकऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
देशातील शेतकऱ्यांचा विरोध असताना तीन काळे कृषी कायदे करून या देशातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा गुलामगिरीत ढकलण्याचा भाजप सरकारचा डाव होता. देशातील शेतकऱ्यांनी या विरोधात प्राणपणाने लढा दिला आणि त्यामुळेच आज देशातील या हुकूमशाही सरकारला अखेर शेतकऱ्यांसमोर झुकावे लागले. शेतकऱ्यांच्या या लढ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पहिल्यापासून बाजूने लढत होता असेही जयंत पाटील म्हणाले.
जवळपास ६३० शेतकऱ्यांनी बलिदान दिल्यानंतर सरकारने हे कायदे परत घेतले आहेत. येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जरी हा निर्णय घेतला असला तरी या काळ्या कायद्यांमधील तरतुदी वेगवेगळ्या मार्गांनी अंमलात आणण्याचा प्रयत्न पुन्हा केंद्रसरकारने करू नये असा सल्लाही जयंत पाटील यांनी दिला आहे.
No comments:
Post a Comment