मुंबई, दि. 26 : मुंबईत 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे संकट परतवून लावण्यासाठी कर्तबगार पोलिसांनी आणि इतर कर्मचारी यांनी केलेल्या कामगिरीचा मला अभिमान आहे. पोलीसांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगत, हल्ल्यातील शहीदांना गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी गेट वे ऑफ इंडिया येथे श्रद्धांजली अर्पण करत अभिवादन केले.
पोलीस बॉईज चेरीटेबल ट्रस्ट संचलित महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना यांच्यातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही शहीद वीरांच्या स्मरणार्थ श्रद्धांजलीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री वळसे -पाटील हे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करताना बोलत होते.
मंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले, पोलीस कर्मचारी-अधिकारी कायम जनतेच्या सेवेसाठी तत्पर असतात. आपल्या जीवाची आणि कुटूंबाची पर्वा न करता नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करत असतात. अशा पोलीसांना सहकार्य करण्याची भूमिका जनतेने ठेवावी आणि कोणतेही अनुचित घटना घडू नये यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन मंत्री वळसे पाटील यांनी जनतेला यावेळी केले.
यावेळी संघटनेच्यावतीने मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना पुष्प देऊन त्यांचे कौतुक आणि आभार मानण्यात आले.
यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या हस्ते दहशतवादी हल्ल्यातील कामगिरीबद्दल मुंबई पोलीस संजय पाटील तर कोरोना काळात रुग्णांना दिलेल्या सेवेबद्दल श्रीमती पद्मावती, पांडुरंग चौघुले, मुंबई मनपाच्या सफाई कामगार विद्या जाधव, बेस्ट बसचालक संतोष कदम यांच्या कार्याचा शाल देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पोलीस बॉईज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल दुबाळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुसुम वाघमारे यांच्यासह पोलीस अधिकारी-कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते.
महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्यावतीने गेल्या पाच वर्षांपासून शहीदांच्या स्मरणार्थ श्रद्धांजलीचा कार्यक्रम राज्यातील ३३ जिल्ह्यांमध्ये आयोजित केला जातो. संकट प्रसंगी मदतीसाठी धावणाऱ्या पोलिसांचे मनोधर्य वाढवणे, हा या कार्यक्रमामागील मुख्य उद्देश होता. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.
No comments:
Post a Comment