मुंबई - कुपोषित मुक्त मुंबई करण्यासाठी मुंबई महापालिकेने योग्य त्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. कुपोषित बालकांचा शोध घेण्यासाठी पालिकेने सर्वेक्षण सुरु केले आहे. ज्या भागात कुपोषित बालके आढळतील, त्यांच्यावर राष्ट्रीय महिला बालकल्याण योजनेअंतर्गत व मुंबई महापालिकेच्या माध्यमातून उपचार करण्यात येतील, अशी माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
मुंबईतील मानखुर्द, गोवंडी, आरे कॉलनीतील आदिवासी पाडा आदी ठिकाणी कुपोषित बालके ( कमी वजन) आढळली आहेत. त्यांच्यावर वेळोवेळी उपचार करण्यात येतात. परंतु मुंबई कुपोषित मुक्त करण्यासाठी पुन्हा एकदा मुंबईतील कुपोषित बालकांचा शोध घेण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येत आहे. सध्या कोरोना विरोधात लढा सुरु असून कोरोना बाधित रुग्णांचा शोध घेतला जात आहे. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचारी कोरोना संशयितांचा शोध घेत असताना क्षय रुग्ण शोधण्यासाठी सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. या मोहीमेतच कुपोषित बालकांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणात कुपोषित बालके आढळल्यानंतर त्यांच्यावर पालिकेच्या रुग्णालयात उपचार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
No comments:
Post a Comment