मुंबई - मुंबईतील भूमिगत जलवाहीन्यांचा आराखडाच नसल्याने नगरसेवकांनी मुंबई महापालिकेला सातत्याने धारेवर धरले आहे. योग्य आराखडा नसल्याचा फटका पालिकेला बसून त्याचा भुर्दंड सहन करावा लागत असल्याचे समोर आले आहे. अंधेरी तेली गल्ली येथील उड्डाण पुलाचे बांधकाम सुरु असताना भुमिगत जलवाहीन्या आल्याने पुलाच्या आराखड्यात बदल करावा लागला. त्यामुळे पुलाच्या खर्चात १७ कोटींनी वाढ झाली आहे.
अंधेरी पूर्व येथील उड्डाण पुलाच्या ग्रेड सेप्रेटरचे काम महानगर पालिकेने २०१६ मध्ये सुरु केले. हे कंत्राट १०१ कोटी २३ लाखांचे होते. तर, ऑक्टोबर २०१८ मध्ये काम संपणे अपेक्षित होते. त्यापूर्वी अंधेरी रेल्वे मार्गावरील गोखले पुलाची मार्गिका कोसळल्यावर पालिकेने या पुलाचे ऑडीट करुन घेतले. त्यानुसार या पुलाच्या जिर्ण झालेल्या दोन्ही बाजूचे उतारांना स्ट्रक्चरल सपोर्ट देणे गरजेचे होते. हे कामही याच कंत्राटदाराकडून करुन घेण्यात आले. तेली गल्ली येथील पुलाचे काम सुरु असताना १२०० आणि १४०० मि.मी व्यासाच्या दोन भूमिगत जलवाहीन्या असल्याचे आढळले. त्यामुळे पुलाच्या सर्वसाधारण आराखड्यात फेरफार करण्यात आले. भुमिगत वाहीन्यांवरुन पोर्टल फ्रेमचे बांधकाम करण्यात आले. त्यामुळे पुलाच्या कामासाठी लागणारे कॉक्रिट, स्टील तसेच बेअरींग मध्ये वाढ झाली. त्यामुळे बांधकामाच्या खर्चात वाढ झाली. याबाबतची सविस्तर माहिती प्रशासनाने येत्या स्थायी समितीच्या पटलावर मांडली आहे.
दरम्यान, पालिकेच्या अंदाजीत दरानुसार कंत्राटदारला २२.५० टक्के जादा दराने काम देण्यात आले. त्यामुळे वाढीव खर्चात पालिकेच्या अंदाजित दरापेक्षा तेवढ्याच प्रमाणात वाढ झाली.
No comments:
Post a Comment