विद्यार्थ्यांना संविधानिक मूल्यांबाबत सविस्तर माहिती व्हावी - वर्षा गायकवाड - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 November 2021

विद्यार्थ्यांना संविधानिक मूल्यांबाबत सविस्तर माहिती व्हावी - वर्षा गायकवाड



मुंबई, दि. 26 : भारतीय संविधान हे जगातील सर्वात विस्तृत आणि सर्वसमावेशक संविधान म्हणून ओळखले जाते. विद्यार्थ्यांना लहान वयापासूनच या संविधानातील मूल्य माहिती होण्यासाठी शालेय अभ्यासक्रमामध्ये त्यांचा सविस्तर समावेश करण्यात यावा, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा एकनाथ गायकवाड यांनी दिले.

शालेय अभ्यासक्रमात संविधानिक मूल्यांचा सविस्तर समावेश करण्यात यावा, याबाबतची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाचे (बालभारती) संचालक विवेक गोसावी, सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ हत्तीअंबिरे हे प्रत्यक्ष तर राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक देवेंद्र सिंग, शिक्षण संचालक (प्राथमिक) दिनकर टेमकर, शिक्षण संचालक (माध्यमिक) महेश पालकर दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

गायकवाड म्हणाल्या, सध्या विद्यार्थ्यांना पहिली पासून मूल्यवर्धन अभ्यासक्रमांतर्गत विविध उपक्रमांद्वारे संविधानिक मूल्य शिकविली जातात. तथापि विद्यार्थ्यांना संवैधानिक हक्क आणि कर्तव्ये, स्वातंत्र्य, एकता, समता, बंधुत्व, सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्षता या मूल्यांसह भारतीय संविधानाची सविस्तर माहिती होणे गरजेचे आहे. यासाठी इयत्ता आणि विद्यार्थ्यांचे वय विचारात घेऊन नवीन शैक्षणिक धोरणानुसार पुनर्रचित अभ्यासक्रम आराखडा निर्मितीच्या अनुषंगाने अभ्यासक्रमामध्ये याबाबींचा सविस्तर समावेश होणे गरजेचे आहे. यासाठी शिक्षण आयुक्त आणि पाठ्यपुस्तक मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सारासार चर्चा करून तातडीने अंमलबजावणी करावी, असे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad