नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज नाशिक येथे एक मोठे विधान केले आहे. अन्यायाविरोधात लढणारे आदिवासी (Aadivasi) हे नक्षलवादी (Naxalite) असून शकत नाहीत, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. तसेच शिवरायांचे राज्य हे भोसल्यांचे नाही, तर ते रयतेचे हिंदवी स्वराज्य म्हणून ओळखले जाते, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील सोनोशी गावामध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये शरद पवार यांनी हे महत्त्वपूर्ण विधान केले आहे.
या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना शरद पवार म्हणाले की, पिढ्यान पिढ्या देशाचे मूळ मालक असलेल्यांची अवस्था आज वाईट झाली आहे. आदिवासींच्या परिस्थितीत सुधारणा होण्याची गरज आहे. आदिवासींसाठी संघर्ष करावा लागेल. मात्र अन्यायाविरोधात लढणारा आदिवासी हा नक्षलवादी असू शकत नाही. पुढील आठवड्यात मी स्वत: नक्षलग्रस्त भागात जाणार आहे. तेथील तरुणांशी मी संवाद साधणार आहे, असे शरद पवार म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याचा उल्लेख कुणी भोसल्यांचे राज्य असा केला नाही, ते रयतेचे राज्य, हिंदवी स्वराज्य म्हणून ओळखले गेले. भीमा-कोरेगावमध्ये ऐतिहासिक घटना घडली. पण त्यावरून देशात वाद झाला. तिथे लढणाऱ्या व्यक्ती ह्या आदिवासी होत्या. बिरसा भगवान मुंडा यांचा वारसा जपला पाहिजे. आदिवासी संस्कृती जपली पाहिजे, असेही पवार म्हणाले. या कार्यक्रमाला छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, नरहरी झिरवाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
विक्रम गोखलेंचा विषय एका वाक्यात संपवला -
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी पुण्यातील एका कार्यक्रमानंतर बोलताना कंगना रणौतला पाठिंबा देत ती योग्य असल्याचे म्हटले होते. यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना प्रतिक्रिया विचारली असता, त्यांनी केवळ एकाच वाक्यात या प्रकरणाचा निकाल लावल्याचे पाहायला मिळाले. शरद पवार निफाडला आले असताना पत्रकारांनी त्यांना विक्रम गोखले यांनी केलेल्या विधानाबाबत प्रतिक्रिया विचारली. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, अशा लोकांच्या वक्तव्याची नोंद घ्यावी, असे मला वाटत नाही. असे लोक असतात समाजात, असे सांगत शरद पवार यांनी यावर अधिक बोलणे टाळले.
केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी अलीकडेच महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार कधीही कोसळणार असल्याचे भाकित केले होते. त्यावर बोलताना, भाजपचे नेते अधूनमधून सरकार पडणार असल्याचे बोलत असतात. आम्ही जर ठरवून घेतले आहे की जुळवून घ्यायचे, त्यामुळे हे सरकार सुरू आहे. आज सरकार जाईल, उद्या जाईल, असे म्हणणाऱ्यांना दिवस मोजायचं काम करावे लागेल, असा टोला शरद पवार यांनी लगावला.
दरम्यान, तुम्ही जिथे आहात तिथे प्रश्न सोडवले पाहिजे. दुसरीकडे वर्ग करून प्रश्न सोडवा, असे म्हणणे अयोग्य आहे. न्यायालयाने देखील याबाबत स्पष्ट भूमिका दिलेली आहे. त्यामुळे यातून केवळ कामगारांचे नुकसान होत आहे. एकादशीला असंख्य लोकं वारीला जातात. त्यांचेही हाल झाले असून, आस्तेला धक्का बसविण्याच काम केले जात आहे, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर दिली.
No comments:
Post a Comment