मुंबई दि 28 - कोविडच्या दोन्ही लाटांचा आपण चांगला मुकाबला केला आहे, मात्र आता या विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचे आव्हान चिंता वाढवणारे असून याची घातकता लक्षात घेता कोणत्याही परिस्थितीत संसर्ग वाढू नये म्ह्णून मुंबईसह सर्व जिल्ह्यांच्या प्रशासनाने अतिशय काळजी घ्यावी. परत एकदा संसर्गाचा वाढ झाली तर लॉकडाऊनसारखे पाऊल परवडणारे नाही, त्यामुळे परत लॉकडाऊन लागू द्यायचा नाही या निर्धाराने नियमित मास्क वापरणे, अनावश्यक गर्दी न करणे, सुरक्षित अंतर पाळणे अशी काही बंधने पाळावीत लागतील असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लसीचे दोन्ही डोस प्रत्येकाने घेणे, विशेषतः विमानतळावरून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत प्रवाशांची काटेकोर चाचणी करणे यादृष्टीने आज जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले. यासंदर्भात केंद्राकडून येणाऱ्या सूचनांची वाट न पाहता युद्धपातळीवर जे जे गरजेचे वाटते ते निर्णय घेऊन आवश्यक पाऊले लगेच टाकावीत असेही त्यांनी स्पष्ट केले.
आपल्या सर्वांमधीलच बेसावधपणा वाढला आहे. "कुछ नही होता यार" असा पवित्रा मोठ्या संकटात टाकू शकतो असे सावधगिरीचे बोल सांगून मुख्यमंत्री म्हणाले की मास्क न वापरणे आणि नियम तोडून अनावश्यक गर्दी करणे यावर काटेकोर कारवाई झालीच पाहिजे असे पहा.
करोना विषाणूच्या ओमायक्रॉन या नव्या उत्परिवर्तित प्रकारामूळे संसर्गाचा धोका वाढणार असून त्याला प्रतिबंध घालण्यासाठी कुठल्या उपाययोजना करता येतील याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, राज्याच्या टास्क फोर्सचे डॉ संजय ओक, डॉ शशांक जोशी, डॉ राहुल पंडित, डॉ अजित देसाई, डॉ खुस्राव्ह बजान, डॉ केदार तोरस्कर, डॉ झहीर अविराणी , डॉ वसंत नागवेकर, डॉ नितीन कर्णिक, मुख्य सचिव सीताराम कुंटे, प्रधान सचिव आरोग्य डॉ प्रदीप व्यास, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे आदींची उपस्थिती होती.
राज्य सरकारला दोन वर्षे पूर्ण झाली, यामध्ये प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांचा देखील सिंहाचा वाटा आहे त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बैठकीच्या प्रारंभी सर्व अधिकाऱ्यांना धन्यवाद दिले.
ऑक्सिजन, औषध उपलब्धता तपासा, अग्निसुरक्षा ऑडिट पूर्ण करा -
कोविडशी अव्याहतपणे लढत असल्याबद्धल मुख्यमंत्र्यांनी प्रशासनातील सर्वांचे कौतुक केले. ते म्हणाले की, नवा व्हेरिएंट हा उंबरठा ओलांडून आला आहे का हे काळजीपूर्वक पाहावे लागेल. दोन्ही लाटांमध्ये आपल्याला कुठं कमी पडलो ते कळत होते. ऑक्सिजनचा साठा वाढविण्यासाठी धावपळ करावी लागली होती. त्यामुळे आता या नव्या विषाणू प्रकारामुळे शहरे असो किंवा दुर्गम भागातली रुग्णालये असोत, आपल्याला ऑक्सिजन निर्मिती, ऑक्सिजन साठा, आगीच्या घटना घडू नयेत म्ह्णून अग्निसुरक्षा तसेच स्थापत्य विषयक ऑडिट, औषधांची उपलब्धता हे सर्व प्रत्येक जिल्हा प्रशासनाने जातीने पाहावे.
मास्क आवश्यकच, अनावश्यक गर्दी होऊ देऊ नका -
महाराष्ट्रातील जनता समजूतदार आहे. यापूर्वीही सरकारच्या सर्व सूचनांचे पालन त्यांनी केले आहे. कोविडचे रुग्ण कमी झाल्यामुळे लोकांमध्ये बेसावधपणा आला आहे. या विषाणूशी कसे लढायचे , कोणते उपचार करावेत हा नंतरचा भाग झाला पण मुळात हा संसर्ग वाढू द्यायचा नसेल तर मास्क अनिवार्य आहेच असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, आता लग्नसराईचे दिवस आहेत. मित्र- आप्तेष्ट परदेशातून देखील येतील त्यामुळे आपल्याला खूप काळजी घ्यावी लागणार आहे.
परदेशातून आलेल्या व्यक्तींवर लक्ष ठेवणे गरजेचे -
परदेशातून लोक मोठ्या प्रमाणावर मुंबईत व इतर ठिकाणी येणे सुरू झाले आहे . त्यापैकी अनेक जण देशांत इतरत्र उतरून देशांतर्गत विमान सेवेने , रस्ते व रेल्वेमार्गे येतात. त्यांच्यात कुणी विषाणूचा वाहक असेल तर इतरांना मोठा धोका होऊ शकतो त्यामुळे अशा प्रवाशांची तपासणी करणे, त्यांच्याकडे लक्ष ठेवणे अत्यावश्यक आहे , त्यादृष्टीने लगेच युद्ध पातळीवर कामाला लागा असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
चाचण्या वाढवा, आवश्यक किटस पुरवा -
यावेळी मुख्यमंत्र्यांनी मधल्या काळात कमी झालेल्या चाचण्यांवर चिंता व्यक्त केली व चाचण्या वाढविण्याचे निर्देश दिले. विषाणूच्या नव्या प्रकाराला ओळखणारे किटस राज्यातील प्रयोगशाळांना मिळण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
लसीकरण करून घ्याच -
छोट्या छोट्या गोष्टींनी या विषाणूला प्रतिबंध होऊ शकतो हे लक्षात ठेवा असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, दोन्ही डोससह लसीकरण करून घेणे अतिशय आवश्यक असून प्रत्येकाने ही काळजी घेतलीच पाहिजे
का आहे ओमायक्रॉन घातक? -
टास्क फोर्सच्या डॉ शशांक जोशी यांनी बैठकीत या विषाणूविषयी माहिती दिली की,
कोविडच्या या नव्या विषाणूने दक्षिण आफ्रिकेतील यापूर्वीच्या डेल्टा व्हेरिएंट प्रकाराची जागा घेतली असून त्याचा संसर्ग कितीतरी अधिक आहे
डेल्टा ची जागा ओमायक्रॉनने अवघ्या दोन आठवड्यात घेतली यावरून त्याची घातकता लक्षात येते
दुसऱ्या लाट्स कारणीभूत असलेल्या डेल्टाचे दोन म्युटेशन होते. बेटा प्रकाराचे तीन म्युटेशन होते पण ओमायक्रॉन या प्रकाराचे पन्नासहून अधिक म्युटेशन आहेत.
हा व्हेरिएंट सध्याच्या औषधांना, लसीला दाद देतो किंवा नाही ते डॉक्टर्स आणि तज्ञ जाणून घेत आहेत पण घाबरून न जाता आपण काळजी घेण्याची गरज आहे कारण याचा संसर्गाचा वेग पूर्वीच्या डेल्टापेक्षा कितीतरी जास्त आहे
डबल मास्क घालणे योग्य राहील. सर्जिकल 3 प्लाय मास्क आणि एन 95 प्रकारातील एक मास्क घालणे उचित ठरेल
खाताना किंवा जेवताना जेव्हा मास्क काढलेला असेल तेच अधिक संधानात बाळगणे गरजेचे
आवश्यक गर्दी टाळा, आवश्यक असेल तरच प्रवास करा
ज्यांनी लस घेतली नाही त्यांनी ती त्वरित घ्यावी
ओमायक्रॉनला रोखण्याचा एकच मार्ग आहे - दुहेरी मास्क घाला, मोकळ्या हवेत राहा, आणि लसींचे दोन्ही डोस घ्या
बैठकीच्या प्रारंभी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी ही बैठक बोलविण्यामागे संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका असल्याचे सांगितले. डॉ प्रदीप व्यास यांनी सादरीकरण करून युरोप तसेच दक्षिण आफ्रिकेत वेगाने पसरणाऱ्या विषाणूविषयी माहिती दिली. यावेळी टास्क फोर्सच्या डॉ संजय ओक, डॉ शशांक जोशी व डॉ राहुल पंडित यांनी देखील यासंदर्भात काळजी घेण्यासाठी मार्गदर्शन केले.
No comments:
Post a Comment