मुंबई - एसटी महामंडळाला शासनात विलिनीकरण करा या मागणीसाठी एसटी कामगारांनी संप पुकारला आहे. विलिनीकरणाचा मुद्दा न्याय प्रविष्ठ असल्याने सरकारने मध्यममार्ग काढत कामगारांना पगार वाढवण्याचा निर्णय जाहिर केला. मात्र सरकारच्या या निर्णयाला विरोध करीत कामगार विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम राहिले आहेत. परिवहमंत्री अनिल परब यांनी हा निर्णय घोषित केल्यानंतर काही वेळातच आझाद मैदानात कामगारांच्या संतप्त प्रतिक्रीया उमटल्या. दरम्यान आंदोलनाला पाठिंबा देणारे भाजपचे आमदार गोपिचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांनी आझाद मैदानातील कामगारांशी संवाद साधला. मात्र पगारवाढीचा निर्णय मान्य नसल्याचे सांगत विलिनीकरणाच्या मागणीवर कामगार ठाम राहिले आहेत. संप मागे घ्यायचा की नाही, याबाबत गुरुवारी सकाळपर्यंत निर्णय घेतला जाईल, असे आमदार गोपिचंद पडळकर यांनी जाहिर केले. त्यामुळे बुधवारीही कामगारांचा आझाद मैदानातच मुक्काम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
एसटी महामंडळ शासनात विलिनीकरण करा या प्रमुख मागणीवर मागील १५ दिवसांपासून शेकड़ो कर्मचारी आझाद मैदानात ठिय्या मांडून आहेत. विलिनीकरणाच्या मुद्दा सद्या न्यायालयात असून याबाबतची सुनावणी १० डिसेंबरला होणार आहे. याबाबत निर्णय घेण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली असून त्याचा अहवाल समिती घेणार आहे. त्यामुळे विलीनीकरणावर सरकार निर्णय घेणार नसून समितीचा निर्णय सरकारला मान्य असेल असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी जाहिर केले होते. मात्र विलीनीकरणाची मागणी मान्य झाल्याशिवाय संप मागे घेणार नाही अशी आक्रमक भूमिका कर्मचा-यांनी घेतली. त्यामुळे सरकारने मध्यममार्ग काढण्याबाबतच्या हालचाली सुरू झाल्या. बुधवारी झालेल्या मॅरेथॉन बैठकीत इतर राज्याच्या तुलनेत एसटी कामगारांचा मूळ पगारात वाढ करण्य़ाचा निर्णय सरकारने घेतला. यावेळी कामगारांच्या आंदोलनाचा पाठिंबा देणारे भाजपचे आमदार गोपिचंद पडळकर व सदाभाऊ खोतही उपस्थित होते. परिवहनमंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत कामगारांना पगार वाढीचा निर्णय घोषित केल्यानंतर पडळकर व खोत कामगारांशी चर्चा करण्यासाठी आझाद मैदानात आले. मात्र त्यापूर्वीच आझाद मैदानात कामगारांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. विलीनीकरणावर ठाम असल्याचे कामगारांनी पडळकर व खोत यांना सांगत सरकार विरोधात घोषणाबाजी सुरु केली. रात्री उशिरापर्यंत कामगारांशी चर्चा करून गुरुवारी संपाबाबतचा निर्णय घोषित केला जाणार असल्याचे पडळकर यांनी जाहिर केले. त्यामुळे बुधवारची रात्रही कामगारांचा आझाद मैदानाच मुक्काम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
No comments:
Post a Comment