मुंबई - शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा १७ नोव्हेंबर रोजी, नववा स्मृतीदिन आहे. या स्मृतीदिनानिमित्त स्मृतीस्थळाच्या सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून ते पुढील दोन दिवसांत पूर्ण होईल, असा विश्वास पालिकेच्या उद्यान विभागातील अधिकाऱ्याने व्यक्त केला.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे १७ नोव्हेंबर २०१२ रोजी निधन झाले. वयाच्या ८६ व्या वर्षी मातोश्री निवासस्थानी त्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे बाळासाहेबांवर अंत्यसंस्कार झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यान अर्थात शिवाजी पार्कमधील जागेत त्यांचे स्मृतीस्थळ बनवण्यात आले आहे. या स्मृतीस्थळावर शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह इतर मंत्री, शिवसेना नेते आणि शिवसैनिक व हितचिंतक आदरांजली वाहण्यासाठी येत असतात. त्यामुळे या स्मृतीस्थळाचे सुशोभिकरण व डागडुजी करण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे.
स्मृतीस्थळावरील जागेचे सुशोभिकरण करण्यासाठी पुण्यातून सुशोभित झाडांची रोपे आणली गेली आहेत. यामध्ये रेड पॉईंटसेटीया, यलो पॉईँटसेटीया आणि जलबेरा आदी फुलझाडांचा समावेश आहे. यासाठी २५० फुलझाडांची रोपटी ही रेड पॉईंटसेटीया आणि २०० यलो पॉईँटसेटीयाची आहेत, तर २५० सफेद शेवंतीची, प्लांबेंगो आदींची रोपटी तसेच ग्रीन लॉन लावून स्मृतीस्थळ सुशोभित केले जात आहे. शिवाय सिव्हिल कामे, विद्युत कामे, रंगरंगोटी करण्यात येत आहे. उद्यानाच्या सुशोभीकरणाचे काम सोमवारी दुपारपर्यंत जवळपास पूर्ण होईल, असे मुंबई महापालिकेचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी सांगितले.
दरम्यान, उद्यान विभाग, विद्युत विभाग, मेंटेनन्स विभागातील एकूण ३५ कर्मचारी सुशोभीकरणाचे काम करत असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
No comments:
Post a Comment