अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शनिवारी सायंकाळी जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाची पाहणी केली व मृतांप्रती शोक संवेदना व्यक्त केली. जखमींची विचारपूस केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, विशेष पोलीस महानिरीक्षक पांडे, आमदार संग्राम जगताप, आमदार लहू कानडे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना, सकाळी साडेदहाच्या सुमारास सदरची आग शॉर्टसर्किटमुळे लागली असण्याची प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे. यामध्ये कोणाचा हलगर्जीपणा असल्यास त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल. यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आठ जणांची समिती आहे. ही समिती या घटनेची सखोल चौकशी करेल. अतिदक्षता विभागातील फायर ऑडिट झाले होते की नव्हते किंवा ऑडिट नंतर ज्या त्रुटी आढळल्या त्यात त्याची पूर्तता केली होती का नव्हती, हेही चौकशीमध्ये निष्पन्न होईल. ही घटना दिवसा घडली होती. त्यामुळे सीसीटीवी फुटेज मध्येही नेमकं कोण दोषी होतं हे आढळून येईल. सरकारने मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत घोषित केली आहे, असंही मुश्रीफ यांनी नमूद केलं.
जिल्हा रुग्णालयातील आगीच्या घटनेची पोलिसांमार्फत स्वतंत्र चौकशी करण्यात येईल. विभागीय आयुक्तांची चौकशी समिती व पोलिसांची चौकशी समिती ही वेगवेगळी असेल. परंतु अहवाल तयार करताना किंवा कारवाई करण्याअगोदर या दोन्ही समित्यांनी त्यांच्या चौकशीतून निघालेला निष्कर्ष पाहिला जाईल, अशी माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक पांडे यांनी पत्रकारांना दिली. या प्रकरणी सध्या अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा आदेश स्थानिक पोलिसांना दिला असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर चौकशीमध्ये जे काही निष्पन्न होईल यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल होईल असेही ते म्हणाले.
मृतांच्या कुटीबीयांना 5 लाखांची मदत -
अहमदनगरच्या रुग्णालयात आग लागून 11 जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाखांची मदत केली जाईल अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले असून मृतांप्रति शोक संवेदना व्यक्त केली आहे.
No comments:
Post a Comment