मुंबई - कोविड-१९ प्रतिबंधक राष्ट्रीय लसीकरण मोहीम अंतर्गत मुंबई महानगरामध्ये पहिली आणि दुसरी मात्रा मिळून एकूण दीड कोटी मात्रा देण्याची कामगिरी आज (दिनांक १० नोव्हेंबर २०२१) अखेर साध्य करण्यात आली आहे. यामध्ये मुंबईतील सर्व शासकीय, महानगरपालिका व खासगी लसीकरण केंद्रांवरील लसीकरणाचा समावेश आहे.
मुंबईसह देशभरात दिनांक १६ जानेवारी २०२१ रोजी कोविड-१९ प्रतिबंधक राष्ट्रीय लसीकरण मोहीम सुरु झाली. टप्प्या-टप्प्याने या मोहिमेची व्याप्ती वाढविण्यात आली. सर्वप्रथम आरोग्य कर्मचाऱयांसाठी लसीकरण सुरु झाले. त्यानंतर आघाडीवरील (फ्रंटलाईन) कर्मचाऱयांसाठी दिनांक ५ फेब्रुवारी २०२१; ६० वर्ष वयावरील तसेच ४५ ते ५९ वयोगटातील सहव्याधी असलेल्या नागरिकांसाठी दिनांक १ मार्च २०२१; ४५ वर्ष वयावरील सर्व नागरिकांसाठी दिनांक १ एप्रिल २०२१; १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी दिनांक १ मे २०२१ पासून लसीकरण सुरु करण्यात आले.
मुंबई महानगरात वेगाने व अधिकाधिक नागरिकांचे कोविड लसीकरण करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभाग विविध उपक्रम राबवित आहे. त्याचाच एक भाग म्हणून विविध समाज घटकांसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करुन विशेष लसीकरण सुरु करण्यात आले. लसीकरण केंद्रांवर जास्त वेळ रांगेत उभे रहावे लागू नये म्हणून दिनांक ४ मे २०२१ पासून ज्येष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह-इन लसीकरण सुरु करण्यात आले. स्तनदा मातांसाठी दिनांक २६ मे २०२१ पासून तर विदेशात शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी अथवा नोकरी / व्यवसायासाठी जाणाऱयांकरीता दिनांक १ जून २०२१ पासून लसीकरण राबविण्यात येत आहे. शारीरिक व मानसिकरित्या दुर्बल व्यक्तिंसाठी दिनांक २३ जून २०२१; गर्भवती स्त्रियांसाठी आणि शासकीय ओळखपत्र नसलेल्या नागरिकांसाठी दिनांक १४ जुलै २०२१ पासून लसीकरण हाती घेण्यात आले. तर, वैद्यकीय कारणांनी व वयोमानाने अंथरुणास खिळून असलेल्या नागरिकांच्या घरी जाऊन दिनांक २ ऑगस्ट २०२१ पासून लसीकरण राबविण्यात येत आहे.
यासोबतच, दिव्यांग व्यक्ती, आदिवासी बांधव, कारागृहांमधील बंदिवान, एलजीबीटी समुदायातील नागरिक इत्यादींसाठी विशेष केंद्र, फक्त महिलांसाठी राखीव विशेष लसीकरण सत्र, शिक्षक आणि १८ वर्ष वयावरील विद्यार्थी यांच्यासाठी राखीव सत्र, फक्त दुसरा डोस देय असणाऱया नागरिकांसाठी राखीव सत्र अशा निरनिराळ्या उपाययोजना महानगरपालिकेने केल्या आहेत. त्याचा परिणाम म्हणून सर्व समाज घटकांपर्यंत पोहोचून सर्वाधिक वेगाने लसीकरण करण्यात मुंबई आघाडीवर आहे. समाजातील कोणताही घटक लसीकरणातून वंचित राहणार नाही, याची पुरेपूर दक्षता प्रशासन घेत आहे.
लसीकरणाची व्याप्ती व वेग वाढवल्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेने सातत्याने विक्रमी कामगिरी नोंदवली आहे. १६ जानेवारी २०२१ रोजी लसीकरण सुरु केल्यानंतर दिनांक ५ मे २०२१ रोजीपर्यंत २५ लाख मात्रा देण्याचा टप्पा गाठण्यात आला. त्यानंतर दिनांक २६ जून २०२१ रोजी ५० लाख, दिनांक ७ ऑगस्ट २०२१ रोजी ७५ लाख, दिनांक ४ सप्टेंबर २०२१ रोजी १ कोटी, दिनांक २८ सप्टेंबर २०२१ रोजी १ कोटी २५ लाख आणि आता दिनांक १० नोव्हेंबर २०२१ रोजी १ कोटी ५० लाख लसीच्या मात्रा देण्याचा टप्पा गाठण्यात आला आहे. आज सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंतच्या लसीकरणाचा विचार करता पहिली व दोन्ही मात्रा मिळून १ कोटी ५० लाख ६७ हजार ८८३ मात्रा देण्यात आल्या आहेत.
जनगणनेच्या सांख्यिकी आधारे आणि पात्र नागरिकांची संख्या लक्षात घेता, शासनाने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना आपापल्या क्षेत्रात लसीकरणाचे उद्दिष्ट निश्चित करुन दिले आहे. त्यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सुमारे ९२ लाख ३६ हजार ५०० पात्र नागरिकांचे कोविड लसीकरण (दोन्ही मात्रा मिळून) करावयाचे आहे.
या उद्दिष्टापैकी आज (दिनांक १० नोव्हेंबर २०२१) सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत ९२ लाख ०४ हजार ९५० (९९ टक्के) नागरिकांनी पहिली मात्रा घेतली आहे. तर ५८ लाख ६२ हजार ९३३ (६३ टक्के) नागरिकांनी दुसरी मात्रा घेतली आहे. मुंबईतील सर्व शासकीय, महानगरपालिका व खासगी लसीकरण केंद्रांचा यामध्ये समावेश आहे. कोविड लसीकरणासाठी केंद्र सरकारकडून संचालित होत असलेल्या कोविन संकेतस्थळावर नोंदविण्यात आलेली ही आकडेवारी आहे.
No comments:
Post a Comment