मुंबई - पाली जलाशयाच्या बांद्रा रेक्लेमेशन इनलेटवर मेहबूब स्टुडिओ येथे ६०० मि.मि. व्यासाच्या जलवाहिनीची मोठी गळती होऊन हजारो लिटर पाणी वाया जात होते. जल अभियंता विभागाने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेऊन १८ तासाच्या अथक मेहनतीनंतर गळती रोखली. त्यामुळे पालिका कराना दिलासा मिळाला आहे.
पाली विभागातील मुख्य जलवाहिनीला गळती लागली होती. जल पुरवठ्याचे पाणी सर्वच बाजूने येत असल्याने व काँक्रीट रोड असल्यामुळे गळती शोधणे अवघड जात होते. गळती शोधक पथकाने आधुनिक यंत्राच्या सहाय्याने जमिनीखालील १२ फूट खोल गळती अचूकपणे शोधले. दुरुस्ती विभागाने जेसीबीचा वापर करून खोदाईचे काम हाती घेतले. या ठिकाणी महानगर टेलिफोन,टाटा,रिलायन्स,अडाणी, महानगर गॕस आदी कंपन्यांच्या उच्च दाबाच्या केबल्सचे जाळे पसरलेले आहे. त्यातून अत्यंत काळजीपूर्वक खोदाईचे काम पालिकेचा जल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केले. कारण गळतीचे पाणी या केबल्सच्या चेंबर मध्ये जात होते. धोका टाळण्यासाठी संबंधित यंत्रणांना विश्वासात घेऊन, आवश्यक ती पूर्ण खबरदारी घेत या केबल्स काही ठिकाणी कापाव्या तर काही ठिकाणी बंद कराव्या लागल्या.
दसरा सण असताना कोणत्याही प्रकारे पाणी पुरवठा खंडित न होता, वाहतुक सुरळीत ठेवून हे काम १८ तास कुठल्याही खंडाशिवाय पूर्ण करण्यात आले. परिसरातील व इमारतीमधील नागरिकांना कोणत्याही स्वरूपाचा त्रास होणार नाही याचीही तसदी घेण्यात आली होती.प्रभावित जलवाहिनी सापडल्यावर आणि निरीक्षण केल्यावर तिच्या तळाला दोन ठिकाणी मोठी गळती निदर्शनास आली. अत्यंत कुशलतेने त्या ठिकाणी प्रथम लाकडी खुट्या ठोकल्या.
त्यानंतर एम.एस.पॕच वेल्डिंग व टेलपीस लावून गळती पूर्णपणे बंद केल्याची माहिती पालिकेच्या जलविभागातून देण्यात आली. जल अभियंता ( प्रभारी) संजय आर्ते, उप जल अभियंता राजेश ताम्हाणे, कार्यकारी अभियंता सुशील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली दुरुस्तीचे काम करण्यात आले.
No comments:
Post a Comment