मुंबई, दि. 27 : शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून पूरस्थितीमुळे बाधित नऊ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 774 कोटी रुपयांची मदत देण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी दिली आहे. कालच 14 बाधित जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2860 कोटी रुपये देण्यास मंजुरी देण्यात आली असून वाटपास सुरुवातही झाली आहे.
कोणत्याही बिकट परिस्थितीत शासन शेतकऱ्यांना मदतीसाठी तत्पर असून शेतकऱ्यांना मदतीसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे.
पूरस्थितीमुळे बाधित जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाढीव दरानुसार मदत देण्यात येत असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री श्री.विजय वडेट्टीवार यांनी सांगितले आहे.
ऑगस्ट ते सप्टेंबर, 2021 या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या निधीमधून निश्चित केलेल्या वाढीव दरानुसार आवश्यक निधीपैकी 75 टक्के एवढा असा एकूण रु 774,15.43 लाख (अक्षरी रुपये सातशे चौऱ्याहत्तर कोटी पंधरा लाख त्रेचाळीस हजार फक्त) इतका निधी सोलापूर, गोंदिया, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, नाशिक आणि जळगाव या नऊ जिल्ह्यांना वितरीत करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. विभागीय आयुक्त यांचेमार्फत हा निधी वितरित करण्याचे निर्देशित करण्यात आले आहे.
दिनांक 21.10.2021 च्या शासन निर्णयान्वये मदतीचे वाढीव दर मंजूर करण्यात आले आहेत. पंचनामे करण्यात आल्यानंतर लाभार्थी निश्चित करण्यात यावेत. त्यानंतरच रक्कम लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने हस्तातंरित करण्याबाबत दक्षता घ्यावी. असे निर्देश देण्यात आले आहेत. लाभार्थ्याना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याची कार्यवाही जिल्हास्तरावर करण्यात येईल.
No comments:
Post a Comment