टीबी रुग्णांवर मिश्र औषध पद्धतीनुसार उपचार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 October 2021

टीबी रुग्णांवर मिश्र औषध पद्धतीनुसार उपचार


मुंबई - औषधांनाही दाद न देणाऱया क्षयरोगांवरील उपचारासाठी एमबीपाल (M-BPal Trial) या पद्धतीने उपचार केला जात आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या गोवंडी स्थित पंडित मदनमोहन मालवीय शताब्दी महानगरपालिका रुग्णालयातील एका रुग्णास सदर मिश्र औषध पद्धतीनुसार उपचार करण्यास आज (दिनांक १२ ऑक्टोबर २०२१) पासून सुरु करण्यात आली आहे. संपूर्ण भारतातून ही औषधी घेणारा हा पहिला रुग्ण ठरला आहे अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

निक्स ट्रायल ९१ टक्के यशस्वी -
औषधांनाही दाद न देणारा क्षयरोग हा दर दोन मिनिटात तीन क्षयरोग्यांचा बळी घेतो, ही वस्तुस्थिती लक्षात घेता, औषध प्रतिरोधी म्हणजेच औषधांनाही न जुमानणारा क्षयरोग (Drug Resistant TB) हा अधिक घातक आहे, याची कल्पना येते. अशा स्थितीत क्षयरुग्णांना दिलासा देवू शकणारी, त्यांना आशेचा किरण दाखवणारी नवीन औषधोपचार पद्धती उपलब्ध झाली आहे. दक्षिण आफ्रिका या देशात निक्स ट्रायल या नावाने ही पद्धती सुमारे ९१ टक्के यशस्वी झाली आहे. यामध्ये अतितीव्र औषध प्रतिरोधी क्षयरोगाच्या पूर्व अवस्थेत असलेल्या (Pre-XDR TB) रुग्णांना बेडाक्विलीन, प्रिटोमॅनिड, लिनेझोलाईड या तीन औषधांची प्रत्येकी एक गोळी एका दिवशी दिली जाते. यापूर्वीच्या उपचार पद्धतीमध्ये निरनिराळ्या ४ ते ५ औषधे मिळून दिवसभरात सुमारे १० ते १२ गोळ्या रुग्णांना देण्यात येत होत्या. तसेच पूर्वीच्या सुमारे १८ ते २४ महिने कालावधीच्या तुलनेत ही नवीन उपचार पद्धती ६ महिन्यांमध्ये गुणकारी सिद्ध होवू शकते. अशी वैद्यकीय तज्ज्ञांना अपेक्षा आहे.

मुंबईत दोन ठिकाणी उपचार -
बृहन्मुंबई महानगरपालिका आणि मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था यांच्या संयुक्त प्रयत्नांनी हीच औषधोपचार पद्धती आता मुंबईतही सुरु करण्यात आली आहे. एमबीपाल (M-BPal Trial) या नावाने सदर औषधोपचार पुरविले जाणार आहेत. सदर औषधोपचार पद्धतीचे भारतातील मुख्य अन्वेषक म्हणून कार्यरत असलेले डॉ. विकास ओसवाल यांच्या अध्यक्षतेखाली सदर उपचार सुरु करण्यात आले आहेत.संपूर्ण भारताचा विचार करता प्रारंभी एकूण ९ ठिकाणी ही औषधोपचार पद्धती संबंधित रुग्णांना मिळणार आहे. यामध्ये मुंबईतील गोवंडी येथील पंडित मदनमोहन मालवीय शताब्दी महानगरपालिका रुग्णालय, घाटकोपरचे सर्वोदय रुग्णालय तर लखनौमध्ये केजीएमयू, आग्रामध्ये एस.एन. वैद्यकीय महाविद्यालय, अहमदाबादचे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, सुरतमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, दिल्लीतील एनआयटीआरडी, आरबीआयपीएमटी, मदुराईतील राजाजी रूग्णालय या वैद्यकीय संस्थांचा समावेश आहे.

पहिल्या रुग्णावर उपचार सुरू -
मुंबईतील दोन ठिकाणांपैकी, गोवंडी स्थित पंडित मदनमोहन मालवीय शताब्दी महानगरपालिका रुग्णालयात आजपासून पहिल्या रुग्णास ही औषधोपचार पद्धती सुरु करण्यात आली आहे. संपूर्ण भारतातून ही औषधोपचार पद्धती सुरु करण्यात आलेला पहिला असा अतितीव्र औषध प्रतिरोधी क्षयरोग पूर्व अवस्थेतील हा क्षयरुग्ण आहे. सदर रुग्णावर या औषधोपचाराने होणाऱया परिणामांचा अभ्यास देखील करण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad