करी रोड येथील अविघ्न पार्क या ६० मजली इमारतीला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेची गंभीर दखल घेऊन महापौर किशोरी पेडणेकर यांनी, पालिकेच्या उपायुक्तांच्या बैठका घेतल्या. या बैठकीला, उप आयुक्त (परिमंडळ -१) विजय बालमवार, उप आयुक्त (परिमंडळ -२) हर्षद काळे, उप आयुक्त (परिमंडळ -३) पराग मसुरकर, उप आयुक्त (परिमंडळ -५) विश्वास शंकरवार उप आयुक्त (अतिक्रमण निर्मूलन ) संजोग कबरे, प्रमुख अग्निशमन अधिकारी हेमंत परब आदी अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत स्पिंकलर पद्धतीमुळे घरातील आगींवर आपण बऱ्याच प्रमाणात नियंत्रण मिळवित असलो तरी उंच इमारतीमधील आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी स्पिंकलरसोबतच अन्य अग्निसुरक्षा साधनांचा समावेश करण्याबाबत अग्निशमन दलाने काटेकोर नियोजन व तयारी करावी. तसेच आगीच्या घटना टाळण्यासाठी उंच इमारती व अग्नी सुरक्षिततेबाबत एक ठोस धोरण निश्चित करावे अशा सूचना महापौरांनी केल्या.
मुंबईतील अनधिकृत बांधकामे व आगीच्या घटनांचा आढावा घेताना महापौर पेडणेकर यांनी, ज्या विभागातील अतिक्रमणाबाबत तक्रार प्राप्त झाली आहे, त्या संबंधित ठिकाणी संबंधित प्राधिकरणांच्या अधिकार्यांसमवेत पाहणी करून तातडीने कारवाई करणार असल्याचे सांगितले. त्यासोबतच पदनिर्देशित अधिकाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरण्याची निर्देशही महापौरांनी यावेळी दिले. तक्रारी प्राप्त झालेल्या संबंधित विभागांना लवकरच भेटी देणार असल्याचे महापौरांनी यावेळी सांगितले.
एकाचा मृत्यू -
करी रोड येथील अविघ्न पार्क या ६० मजली इमारतीमधील १९ व्या मजल्यावर आग लागली होती. यावेळी या फ्लॅटमध्ये फर्निचरचे काम सुरू होते. आग लागताच या ठिकाणी काम करणाऱ्या कामगाराने खिडकीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याचा खाली पडून मृत्यू झाला. या इमारतीमध्ये आग विझवताना अग्नीसुरक्षा यंत्रणा योग्य प्रकारे काम करत नसल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी पालिका आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
No comments:
Post a Comment