मुंबई-३०-(प्रतिनिधी)- दोष नसताना देखील सलग २२ महिने मला सेवेतून बाजूला रहावे लागले. प्रशासनात माझी बाजू एकूण घेतली गेली नाही, तरीही मी लढत राहिलो आणि निर्दोष बाहेर पडलो परंतु निर्दोष असतानाही ज्या यातना असतात या सबंधित व्यक्तीलाच माहित असतात असे सांगतानाच माझ्यासारखी वेळ कुणावरही येवू देवू नका अशी खंत सार्वजनिक रस्ते व बांधकाम सचिव अनिलकुमार गायकवाड यांनी व्यक्त केली.
आपल्या ३२ वर्षांच्या शासकीय सेवेतून अनिलकुमार गायकवाड सेवानिवृत्त झाले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने मंत्रालयातील परिषद सभागृहात काल सायंकाळी त्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना गायकवाड यांनी आपल्या कार्यकाळातील आठवणीना उजाळा दिला. बांधकाम खात्याविषयी पूर्वीपासूनच आवड होती नोकरी करायची तर बांधकाम खात्यातच या जिद्दीने प्रयत्न करीत राहिलो. एका कॉलेजमध्ये नाईलाजाने दोन वर्ष प्राध्यापक म्हणून काढले. जल संपदा विभागातदेखील नाईलाजाने पहिली नोकरी केली परंतु मन रमले नाही. प्रयत्न करीत राहिलो, १९८६ ला एमपीएससी परीक्षा दिली. त्याचा निकाल १९८७ ला आला. चांगल्या मार्कांनी पास झालो आणि एप्रिल १९८९ रोजी सार्वजनिक बांधकाम विभागात रुजू झालो. अशी आठवण त्यांनी करून दिली.
सेवाकाळात ५ ठिकाणी काम केले. मंत्रालयात १ नोव्हेंबर २०२० पासून अवघे एक वर्ष मिळाले. त्यातील सहा महिने कोरोनामध्ये गेले. केवळ सहा महिनेच काम करता आले. मंत्रालयातील कामकाजाविषयी लोकांमध्ये नकारात्मक रित्या बोलले जात होते, परंतु या कार्यकालात मंत्रालयीन कामाचा अनुभव नसतानाही विभागातील सर्वांच्या कार्यपद्धती समजून घेतल्या व सर्वांचे चांगले सहकार्य मिळाले असे ते म्हणाले.
आपल्या आयुष्यातील ३२ वर्षाच्या सेवाकाळातील जून २०१५ ते एप्रिल २०१७ अशी दोन वर्ष विनाकारण वाया गेली. अशी खंत त्यांनी बोलून दाखविली. कालिना विद्यापीठ तसेच महाराष्ट्र सदन प्रकरणात दोष नसतानाही आपल्याला गोवण्यात आले. सलग २२ महिने बाहेर रहावे लागले.आपल्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे योजिले आहे. त्यामुळे आपणास निलंबित करण्यात येत आहे, अशी आगळीवेगळी नोटीस देवून कारवाई करण्यात आली, यावर प्रशासनाकडे आपले म्हणणे १० पानांचा कागद लिहून मांडले परंतु तो कागद उघडून देखील पहिला गेला नाही अशी खंत गायकवाड यांनी बोलून दाखविली. निलंबनाचा काल हा केवळ ३ महिनेच असावा असे न्यायालयाचे निर्देश आहेत, मात्र त्यावर काम केले जात नाही. मंत्रालयात आपले कर्मचारी किवा अधिकारी यांच्यावर शिस्तभंग किवा निलंबनाची कारवाई करीत असताना माझासारखी वेळ कुणावरही येवू देवू नका, संबंधितांचे म्हणणे गांभीर्याने घ्यावे अशी विनंती त्यांनी उपस्थित अधिका-यांना केली.
सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी व कर्मचा-यांनी यावेळी आपली मनोगते व्यक्त करताना गायकवाड यांच्या कामाबद्दल कौतुक करताना त्यांना समृद्धी महामार्ग या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी शासनाने पुन्हा संधी द्यावी अशी भावना व्यक्त केली. विभागाच्या वतीने स्मृतीचिन्ह शाल पुष्पगुच्छ देवून त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी विभागातील कर्मचारी अधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment