
मुंबई - भ्रष्टाचाराचे आरोप करून ठाकरे सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या किरीट सोमय्यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा केला होता. त्यामुळे त्यांनी केंद्राकडे सुरक्षेची मागणी केली होती. त्यानंतर आता केंद्रानं त्यांना झेड दर्जाची सुरक्षा दिली आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे ४० जवान त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असतील.
गेल्या काही महिन्यांपासून किरीट सोमय्या महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर आरोप करत आहेत. विशेषत: शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते त्यांच्या रडारवर आहेत. मुख्यमंत्री ठाकरेंचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकरांचा बंगला अवैध असल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. त्यानंतर नार्वेकरांना बंगला पाडावा लागला. परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरही सोमय्यांनी गंभीर आरोप केले आहेत. ‘ठाकरे सरकारचा एक अनिल (माजी गृहमंत्री अनिल देशमुख) जेलच्या दरवाजात उभा आहे, तर दुसरा अनिल (परिवहन मंत्री अनिल परब) जेलमध्ये जाण्याचा मुहूर्त शोधत आहे. हे दोन्ही अनिल लवकरच जेलमध्ये जाणार,’ असं सोमय्यांनी काही दिवसांपूर्वीच म्हटलं होतं. गेल्या अनेक महिन्यांपासून सोमय्या अॅक्टिव्ह मोडमध्ये असून शिवसेना, राष्ट्रवादीचे मंत्री त्यांच्या रडारवर आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख, परिवहन मंत्री अनिल परब, शिवसेना खासदार भावना गवळी, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांच्यावर सोमय्यांनी घणाघाती आरोप केले आहेत.
सोमय्या यांनी ठाकरे सरकारमधील मंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. माझ्यामुळे काही मंत्र्यांची झोप उडाली आहे. त्यामुळे ते भाई लोकांची मदत घेत आहेत, असा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. मात्र, हे मंत्री कोण आहेत? आणि कोणत्या भाईंची मदत घेत आहेत, हे त्यांनी स्पष्ट केलं नाही. वाशीममध्ये माझ्यावर जो हल्ला झाला त्यात भावना गवळींचे काही भाई लोक होते. तसं रिपोर्टमध्येही आलं आहे. त्यामुळेच केंद्र सरकारच्या गृह मंत्र्यांनी मला सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे, असं सोमय्या यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात २१ पक्ष आणि २१ नेते समोर येत आहेत. मग ममता बॅनर्जी असो, उद्धव ठाकरे असो, शरद पवार असो, राहुल गांधी असो या सोनिया गांधी. पण हे २१ लोक एक होऊन मोदी होऊ शकत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
No comments:
Post a Comment