बार्टी व राज्य सरकारच्या मदतीने ऑनलाईन प्रशिक्षण घेऊन जानेवारी 2021 मध्ये यूपीएससीच्या परीक्षा झालेल्या विद्यार्थ्यांपैकी लेखी परीक्षा व त्यानंतर ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये यूपीएससी मार्फत झालेल्या मुलाखती व अन्य चाचण्या यशस्वीरीत्या पूर्ण करून बार्टीच्या 9 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असून, हे 9 जण भारतीय सर्वोच्च नागरी सेवेत अधिकारी होणार आहेत.
यामध्ये सुहास गाडे (रँक-349), आदित्य जीवने (रँक-399), शरण कांबळे (रँक-542), अजिंक्य विद्यागर (रँक-617), हेतल पगारे (रँक-630), देवव्रत मेश्राम (रँक-713), स्वप्नील निसर्गन (रँक-714), शुभम भैसारे (रँक-727) आणि पियुष मडके (रँक-732) या भावी अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
बार्टी मार्फत दरवर्षी राज्यातील निवडक विद्यार्थ्यांना यूपीएससी परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी दिल्ली येथे प्रायोजकत्व देण्यात येते. परंतु मागील काही महिन्यात कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत प्रायोजकत्व देण्याऐवजी ऑनलाईन प्रशिक्षण व अन्य मदत केली जात होती. परीक्षेच्या पूर्वतयारी साठी सर्वतोपरी मदत मिळावी यासाठी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी महत्वपूर्ण भूमिका निभावली होती.
दरम्यान, विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश आमच्या प्रयत्नांना सार्थक करणारे आहे, या विद्यार्थ्यांनी भावी जीवनात मोठे अधिकारी म्हणून काम करताना देशाच्या प्रगतीमध्ये योगदान द्यावे. सामान्य व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी सतत आपल्या पदाचा सकारात्मक वापर करावा, अशी अपेक्षा व्यक्त करत धनंजय मुंडे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
No comments:
Post a Comment