मुंबई - मुंबईत यंदाही साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे. गणेशोत्सवासाठी गेल्यावर्षीचीच नियमावली यंदाही लागू राहणार आहे, असे गणेशोत्सव समन्वय समितीच्या बैठकीत महापालिकेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांना कोरोना नियमांचे पालन करण्याचे हमीपत्र द्यावे लागणार आहे.
गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीसाठीची झालेल्या बैठकीत समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड नरेश दहिबावकर, मंडळांचे पदाधिकारी व पालिकेचे गणेशोत्सव समन्वयक व उपायुक्त हर्षद काळे उपस्थित होते. यंदाचा गणेशोत्सव हा गेल्यावर्षी प्रमाणेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होत आहे. गेल्यावर्षी ज्या गणेश मंडळांना परवानग्या देण्यात आल्या होत्या, त्याच धर्तीवर मंडळांना यावर्षी देखील परवानग्या देण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. कृत्रिम तलाव, गणेश मूर्ती संकलन केंद्रे यांची कार्यवाही व संख्याही गेल्यावर्षी प्रमाणेच असणार आहे.
प्रमुख चौपाट्यां तसेच विसर्जनस्थळी गणेशभक्तांची होणारी गर्दी लक्षात घेऊन यंदाही सार्वजनिक गणेश मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावातच केले जाणार आहे. याबाबतचा अंतिम निर्णय गणेशोत्सवापूर्वी घेण्यात येईल असे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. गेल्या वर्षी मूर्तीची उंची चार फूट ठेवण्याचे आदेश राज्य सरकारने दिले होते. यंदाही मूर्तीची उंची चार फूट ठेवण्याचे आदेश आहेत. तसेच मंडपाचे आकारमानही कमीत-कमी ठेवावे व गर्दी वाढू नये याकडे पालिकेने लक्ष वेधले असल्याचे सांगण्यात आले.
No comments:
Post a Comment