नवी दिल्ली - कोविशील्ड आणि कोवॅक्सिन लसींचे कॉकटेल डोस कोरोनावर मात करण्यासाठी अधिक प्रभावी ठरत असल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता भारतीय औषध नियामक मंडळा(डीजीसीआय)ने मोठा निर्णय घेतला आहे. या दोन्ही लसींच्या मिश्र डोसची परिणामकारकता तपासण्यासाठी अभ्यास करण्याला डीजीसीआयने आता परवानगी दिली आहे.
वेल्लोरच्या ख्रिश्चियन मेडिकल कॉलेजमध्ये याबाबतची वैद्यकीय चाचणी करण्यात येणार आहे. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेच्या तज्ज्ञ समितीने या अभ्यासासाठी शिफारस केली होती. एकाच व्यक्तीला दोन वेगवेगळ्या लसींचे डोस दिले गेल्याने त्याने कुठलाही अपाय तर होणार नाही ना, हे अभ्यासात तपासले जाणार आहे. या तपासणीचा चौथा टप्पा लवकरच पूर्ण केला जाणार आहे.
उत्तर प्रदेशात काही व्यक्तींना चुकून दोन वेगवेगेळ्या लसींचे डोस देण्यात आले होते, त्यानंतर त्यांची तपासणी केली असता, दोन वेगळ्या लसींचे डोस परिणामकारक ठरत असल्याचा निष्कर्ष आयसीएमआरने काढला होता. कोविशील्ड आणि कोवॅक्सिन या दोन्ही लसींचा संमिश्र डोस घेणे सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढत असून, कोरोना लसीकरणाला वेग येईल, अशी माहिती आयसीएमआरने दिली होती.
भारतात परवानगी मिळालेली जॉन्सन अँड जॉन्सन ही पहिलीच सिंगल डोस लस असून दोनच दिवसांपूर्वी कंपनीने केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवला होता. या लसीचा एक डोस प्रभावशाली असल्याचा कंपनीचा दावा आहे. कोरोनावर जॉन्सन अँड जॉन्सनची लस ८५ टक्के प्रभावी असल्याचा कंपनीचा दावा आहे. तसेच साऊथ आफ्रिका आणि ब्राझील व्हेरिएंटवरही प्रभावशील असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
No comments:
Post a Comment