मुंबई - प्रेम विवाह किंवा प्रेम केले म्हणून काही कुटुंब हिंसक पाऊल टाकतात. अशीच एक घटना मुंबईच्या चेंबूर भागात घडली आहे. कुटुंबातील एका तरुणीवर तरुणाचं प्रेम असल्याने दोन महिलांनी त्या तरुणाची निघृणपणे हत्या केली आहे. या प्रकरणी आरसीएफ पोलिसांनी दोन महिलांना अटक केली असून पोलीस अधिक तपास करत आहे.
संबंधित घटना ही चेंबूरच्या सह्याद्रीनगर परिसरात घडली. मृतक तरुणाचं नाव सुनील सुधाकर जांभूळकर असं आहे. तर त्याची हत्या करणाऱ्या आरोपी महिलेंचे करुणा उर्फ संतोषी माने आणि उषा माने असे नावे आहेत. दोघी महिला या नणंद-भावजय आहेत. त्यांच्या कुटुंबातील एका तरुणीसोबत सुनील याचे प्रेमसंबंध होते. पण ते माने कुटुंबियांना मान्य नव्हते. त्यामुळे या मुद्द्यावरुन दोघी महिलांचं सुनील सोबत याआधी देखील भांडण झालं होतं.
प्रेम प्रकरणावरुन सुनील याचं प्रेयसीच्या कुटुंबातील महिलांसोबत वारंवार भांडण होऊन देखील तो तिला भेटण्यासाठी तिच्या घराजवळ आला. यावेळी करुणा माने आणि उषा माने यांना सुनील घराजवळ आल्याची माहिती मिळाली. त्यांनी सुनीलला शिवीगाळ करत वाद घातला. त्यानंतर त्यांनी सुनीलला पकडलं आणि एका बंद खोलीत नेलं. तिथे त्यांनी सुनीलला प्रचंड मारहाण केली. दोघी महिलांनी लाकडी दांड्यांनी सुनीलला मारहाण केली.
महिला फक्त इतक्यावरच थांबल्या नाहीत. तर त्यांनी ओढणीने सुनीलचा गळा दाबला. यावेळी सुनील श्वास घेण्यासाठी तडफडू लागला. पण निर्दयी महिलांना त्याची दया आली नाही. अखेर सुनीलने श्वास सोडला. त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती परिसरात पसरली. त्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती मिळाली.
पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी घटनेचा पंचनामा केला. त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. तर आरोपी महिलांना अटक केली. आरसीएफ पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
No comments:
Post a Comment