एक वर्षाखालील बालकांना पीसीव्ही लस - न्युमोनिया आजारांपासून संरक्षण - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 July 2021

एक वर्षाखालील बालकांना पीसीव्ही लस - न्युमोनिया आजारांपासून संरक्षण



मुंबई - बृहन्‍मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील एक वर्षाखालील बालकांना न्‍युमोनिया आणि इतर न्‍युमोकोकल आजारांपासुन संरक्षण देणारी ‘न्यूमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सीन’ (Pneumococal Conjugate Vaccine / PCV) देण्‍यास लवकरच सुरूवात करण्‍यात येणार आहे. महानगरपालिकेच्‍या आरोग्‍य केंद्रासह दवाखाने व रूग्‍णालयांमध्‍ये ही लस मोफत दिली जाणार आहे. बृहन्‍मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील १ वर्षाखालील बालकांची संख्‍या ही सुमारे दीड लाखापेक्षा अधिक आहे. या सर्व बालकांना या लसीचा लाभ मिळणार आहे, अशी माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.

महानगरपालिका क्षेत्रातील नागरीकांना विविध नागरी सेवा-सुविधा देणारी आपली बृहन्‍मुंबई महानगरपालिका नागरीकांच्‍या आरोग्‍याचीही काळजी नियमितपणे घेत असते. या अंतर्गत मनपाच्‍या आरोग्‍य केंद्र, दवाखाने व रूग्‍णालयांमध्‍ये विविध वैद्यकीय औषधोपचारांसह लसीकरण देखील नियमितपणे करण्‍यात येत असते. या अंतर्गत आता बृहन्‍मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील एक वर्षाखालील बालकांना न्‍युमोनिया आणि इतर न्‍युमोकोकल आजारांपासुन संरक्षण देणारी ‘न्यूमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सीन’ (Pneumococal Conjugate Vaccine / PCV) देण्‍यास लवकरच सुरूवात करण्‍यात येणार आहे. सदर लसीकरणाच्‍या अनुषंगाने पूर्वतयारीचा भाग म्‍हणून संबंधित कर्मचा-यांना प्रशिक्षण देण्‍यात येत असुन क्षेत्रीय स्‍तरावर जनजागृती करण्‍यात येत आहे. तसेच लस, सिरींजेस व इतर सामुग्रीचे वितरण याची व्‍यवस्‍था करण्‍यात येत आहे. यानंतर राज्‍य शासनाच्‍या निर्देशानुसार बालकांचे प्रत्‍यक्ष लसीकरण सुरू करण्‍यात येईल, अशी माहिती महापालिकेच्‍या सार्वजनिक आरोग्‍य खात्‍याव्‍दारे देण्‍यात आली आहे.

या लसीकरण कार्यक्रमाबाबत महत्‍वाची माहिती अशी की, विस्‍तारीत लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत बीसीजी, पोलिओ, घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, हेपेटाइसिस-बी, एच इन्फ्लुएंझा-बी, रोटा वायरस, गोवर, रुबेला या आजारावर प्रतिबंधक लस देण्यात येते. राज्य शासनाच्या निर्देशानुसार सदर लसीकरण मोहिमेत आता आणखी एका नवीन लसीचा अंर्तभाव करण्‍यात आला आहे. या लसीचे नाव ‘न्यूमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सीन’ (PCV) असे असुन या लसीमुळे न्युमोकोकल न्युमोनिया आणि इतर न्युमोकोकल आजारापासून ही लस संरक्षण मिळु शकणार आहे.

भारतात सन २०१० मध्ये न्युमोकोकल या आजाराने पाच वर्षाखालील अंदाजे १ लाख बालमृत्यूंची नोंद झाली होती. तर त्याचवर्षी देशभरात ५ ते ६ लाख बालकांना न्युमोनिया हा गंभीर आजार झाल्याची नोंद देखील झाली होती. स्ट्रेप्टोकोकस न्युमोनिया या जीवाणूमुळे न्युमोकोकल हा संसर्गजन्य आजार होतो हा आजार म्‍हणजे फुफुसांना होणारा एक प्रकारचा संसर्ग आहे. या आजारामुळे बालकांना श्वास घ्यायला त्रास होतो, धाप लागते, ताप येतो व खोकलाही येतो तसेच जर सदर संसर्ग गंभीर स्वरूपाचा असल्‍यास तर मेंदुज्वर, नुमोनिया सेप्टीसीमीया अशा कारणामुळे मृत्यू देखील ओढवू शकतो.

या अनुषंगाने भारत सरकारने न्युमोकोकल आजारापासुन बालकांचे संरक्षण करण्‍यासाठी सार्वत्रिक लसीकरणामध्ये ‘न्यूमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सीन’ (PCV) ही लस उपलब्ध करुन दिलेली आहे. नियमित लसीकरण कार्यक्रमात ‘न्यूमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सीन’ (PCV) या नवीन लसीचा अंतर्भाव करण्यात येणार आहे. यानुसार लवकरच बृहन्‍मुंबई महानगरपालिकेतील आरोग्‍य केंद्रे, प्रमुख व उपनगरीय रुग्णालय तसेच शासकीय रुग्णालयामध्‍येही सदर लस मोफत देण्यात येणार आहे.

पीसीव्ही लसीचे वेळापत्रक (Schedule) : 
पीसीव्ही लस तीन डोसमध्ये दिली जाणार आहे २ प्रायमरी डोस वयाच्या ६ आठवड्यात, १४ आठवड्यात आणि १ बूस्टर डोस वयाच्या ९ व्या महिन्यात देण्यात येईल. ही लस बालकांना उजव्‍या मांडीवर स्‍नायुमध्‍ये दिली जाणार आहे. पहिल्या डोससाठी येणार्‍या १ वर्षाच्या आतील बाळाला पोलिओ, रोटा, आयपीव्ही, पेंटा या लसी सोबत देण्यात येईल.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad