मुंबई - पालिकेत २०१३ मध्ये सत्तेत असताना गोवंडी- शिवाजी नगर येथील एका रस्त्याला ‘टिपू सुलतान’ नाव देण्यास भाजपने पाठिंबा दिला होता. आता मात्र याच नावाला भाजपकडून विरोध केला जातो आहे. भाजप आता नामकरणासाठी केवळ राजकारण करीत असल्याची टीका महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली आहे.
भाजपने २०१३ मध्ये स्थापत्य समितीत मंजुरीसाठी नामकरणाचा प्रस्ताव मांडला होता. यावेळी भाजपने पाठिंबा दिला. या प्रस्तावाची प्रतच महापौरांनी सादर केली. भाजपचा दुटप्पीपणाचे राजकारण सुरू असल्याचे महापौरांनी म्हटले आहे. गोवंडी डंपिंग ग्राऊंड येथील एका उद्यानाला ‘टिपू सुलतान’ नाव देण्यावरून गुरुवारी झालेल्या बाजार उद्यान समितीच्या बैठकीत भाजपने प्रचंड गोंधळ घातला. संबंधित उद्यानाचे काम अपूर्ण असल्यामुळे माहिती मागवून प्रस्ताव आयुक्तांकडे परत पाठवल्याचे बाजार उद्यान समितीच्या अध्यक्षा प्रतिमा खोपडे यांनी जाहीर करूनही भाजप नगरसेवकांचा गोंधळ सुरू होता. या पार्श्वभूमीवर महापौर किशोरी पेडणेकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली.
एम/पूर्व विभागातील बाजीप्रभू देशपांडे मार्गापासून रफीक नाल्यापर्यंतच्या या नाल्याला तत्कालीन अपक्ष नगरसेवक मोहम्मद सिराज शेख यांनी ‘टिपू सुलतान’ नाव देण्याची मागणी केली होती. या मागणीला सध्याचे भाजपचे आमदार आणि तत्कालीन नगरसेवक खुद्द अमित साटम यांनीच अनुमोदन दिले होते. त्यामुळे भाजप नगरसेवकांकडून शिवसेनेला नाहक बदनाम करण्यासाठीच आरोप केले जात असल्याचेही महापौर पेडणेकर यांनी स्पष्ट केले.
काय आहे प्रकरण-
गोवंडी विभागातील प्रभाग क्रमांक १३६च्या समाजवादी पक्षाच्या स्थानिक नगरसेविका रुक्साना सिद्दीकी यांनी या ठिकाणच्या पालिकेच्या उद्यानास ‘टिपू सुलतान उद्यान' असे नाव देण्याची मागणी विनंती पत्राद्वारे केली आहे. नामकरणाचा हा प्रस्ताव बाजार उद्यान समितीच्या बैठकीत प्रशासनाकडून मंजुरीसाठी मांडण्यात आला. मात्र संबंधित उद्यानाचे काम अपूर्ण असल्यामुळे प्रस्ताव आयुक्तांकडे फेरविचारार्थ पाठवण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment