मुंबई - मुंबईचे वैभव असलेल्या वरळी परिसरातल्या जांभोरी मैदानाची स्थिती दयनीय आहे. या मैदानाचे ऐतिहासिक महत्व लक्षात घेऊन जॉगिंग ट्रकसह दर्जोन्नती करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. सदर मैदान नागरिकांसाठी अधिक दर्जेदार करण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. या कामासाठी पालिका १ कोटी २० लाख ८१ हजार ७११ रुपये खर्च केला जाणार आहे.
वरळी परिसरातील जी. एस. भोसले मार्गावरील या जांभोरी मैदानाचा वापर विविध प्रकारच्या खेळांसाठी व ज्येष्ठ नागरिकांसाठी फेरफटका मारण्यासाठी केला जात आहे. मात्र ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या मैदानाची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे मैदानाचे महत्व लक्षात घेऊन या मैदानाचा दर्जोन्नतीचे काम हाती घेतले जाणार आहे.
पालिकेच्या माध्यमातून जी/दक्षिण विभागातील ऐतिहासिक ठिकाणांच्या सौंदर्यीकरणासह मैदाने, उद्यानांच्या विकासाची अनेक कामे करण्यात येत आहेत. नव्या कामात जांभोरी मैदानात जॉगिंग ट्रकसह दर्जेन्नतीची अनेक कामे करण्यात येत असून सातरस्ता सर्कल आणि अभ्यास गल्ली येथे सौंदर्यीकरण आणि इतर कामे करण्यात येणार आहेत. मैदान परिसरातील नागरिकांसाठी अनुकूल ठरावे यासाठी 'मे. रचना संसद'च्या तज्ञ वास्तुविशारदांसमवेत सर्वेक्षण करून मैदानाचा आराखडा बनवून घेण्यात आला आहे. या ठिकाणाचे सौंदर्यीकरणही आराखडय़ानुसार करण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment