मुंबई - मुंबईमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार सुरु असल्याने निर्बंध लागू आहेत. या निर्बंधानुसार मुंबईकरांना लोकल ट्रेन मधून प्रवास करण्याची मुभा नाही. तरीही काही लोक बनावट ओळखपत्र दाखवून रेल्वेमधून प्रवास करत असल्याचे निदर्शनास आले आहे. बनावट ओळखपत्रावर मध्य आणि पश्चिम रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या सुमारे ५ हजार लोकांवर कारवाई करून ६ कोटी रुपायांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच ५२ लोकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पश्चिम रेल्वेवर एप्रिल ते जून दरम्यान बनावट ओळखपत्रावर प्रवास करणाऱ्या ७४० जणांकडून ३ लाख ७ हजारांचा दंड वसुल केला. याशिवाय आरपीएफने बनावट ओळखपत्र दाखविणाऱ्यावर ५२ गुन्हे दाखल केले. मध्य रेल्वेवर जून महिन्यात बनावट ओळखपत्र बाळगणाऱ्या १ हजार १९२ प्रवाशांकडून ५ काेटी ९६ लाखांचा दंड वसुल केला आहे. तर २८ एप्रिल ते ३० जून दरम्यान ३ हजार २०८ जणांवर कारवाईकरून १६ लाख रुपये दंड गाेळा केला आहे. तसेच पश्चिम रेल्वेवर विना तिकिट प्रवास करणाऱ्या ६५ हजार ५८८ प्रवाशांकडून ३ काेटी ३३ लाख १४ हजार १८२ रुपयांचा दंड वसुल केला आहे. मध्य रेल्वेवर जून महिन्यात ६३ हजार ५१० फुकट्या प्रवाशांंना २ काेटी ६२ लाखांचा दंड आकारला आहे.
गेल्या आठवड्यापासून कारवाईचा जाेर वाढविण्यात आला आहे. त्यामुळे प्रवासी संख्येत घट झाली आहे. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, २१ जून राेजी मध्य रेल्वेवर १८ लाख ७९ हजार तर पश्चिम रेल्वे मार्गावरुन १३ लाख प्रवाशांनी प्रवास केला हाेता. परंतु आता लाेकलच्या प्रवासी संख्येत घट हाेत आहे. ८ जुलै राेजी मध्य रेल्वेवरून १० लाख ६८ हजार तर पश्चिम रेल्वेवर ८ लाख ७० हजार प्रवाशांनी प्रवास केला आहे. म्हणजेच उपनगरीय रेल्वे मार्गावरुन सुमारे ३१ लाख प्रवासी प्रवास करीत हाेते. त्यांची संख्या आता १८ लाखांवर आली आहे. त्यामुळे १३ लाख प्रवासी संख्या घटली आहे.
No comments:
Post a Comment