मुंबई - कोरोनाबाधित रुग्ण संख्येत झपाट्याने घट होत असली तरी सध्या लागू असलेले निर्बंध शिथिल करण्याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिका सावध भूमिका घेत आहे. प्रशासनाची रुग्ण संख्येवर नजर असणार असून पुढील १५ दिवस रुग्ण संख्येचा सतत आढावा घेण्यात येणार असल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. दरम्यान, पुढील १५ दिवस तरी लोकल प्रवासाची प्रतीक्षा मुंबईकरांना करावी लागणार आहे.
राज्यात ब्रेक द चैन अंतर्गत लॉकडाऊनमध्ये ७ जूनपासून शिथिलता देण्यात आली आहे. मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट ५.२५ वरून ४.४० टक्के झाल्याने या आठवड्यात मुंबईचा समावेश दुसऱ्या स्थरात झाला आहे. यामुळे मुंबईमध्ये दुसऱ्या स्थरातील निर्बंध लागू व्हायला हवे होते. मात्र कोरोनाच प्रसार अद्याप कमी झाला नसल्याने तिसऱ्या स्तरातील निर्बंध यापुढे आणखी काही दिवस लागू राहतील. यामुळे मुंबईकरांना सध्यातरी दिलासा मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
कोरोनाची दुसरी लाट येताच रुग्णसंख्या झपाट्याने वाढल्याने १४ एप्रिलपासून राज्यात लॉकडाऊन लावण्यात आला. रुग्णसंख्या कमी झाल्याने ७ जूनपासून लॉकडाऊनमध्ये शिथिलता देताना सरकारने पाच स्तर निश्चित केले. त्याप्रमाणे नियमही आखून दिले आहेत. देशाला मुंबई मॉडेलचे धडे देणारी मुंबई तिसऱ्या स्तरात होती. आता पॉझिटिव्हिटी रेट कमी झाल्याने मुंबईचा दुसऱ्या स्तरात समावेश झाला आहे. मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट सध्या ४.४० टक्के इतका आहे.
No comments:
Post a Comment