ठाणे - दाक्षिणात्य अभिनेत्री मीरा चोप्राने ठाणे महापालिकेच्या पार्किंग प्लाझा येथील लसीकरण केंद्रात बनावट ओळखपत्राच्या आधारे लस घेतल्याचे प्रकरण गाजत असतानाच, अशी आणखी १३ बनावट ओळखपत्रे तयार केल्याचे प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे. या ओळखपत्रांच्या आधारे कितीजणांनी लस घेतली ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. चोप्राचे प्रकरण उघड झाल्यावर महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी चार जणांची चौकशी समिती नेमली असून, या समितीने पहिल्याच दिवशी अशी १३ बनावट ओळखपत्रे तयार करून लस घेतल्याचे निदर्शनास आणले.
शनिवारी चोप्राने लस घेतल्यानंतर सुरुवातीला सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले. त्यानंतर टीका सुरू झाल्यानंतर तिने ते फोटो काढून टाकले. तसेच चोप्राने आरोप फेटाळले. पार्किंग प्लाझा कोविड सेंटरमध्ये सुपरवायझर असल्याचे चोप्राचे बनावट ओळखपत्र उघड होताच प्रकरणाला गंभीर वळण लागले. या ओळखपत्रावर ठाणे महापालिकेचा लोगा आणि ओम साई आरोग्य केअर प्रा. लि., या संस्थेचे नाव आहे. ही संस्था ग्लोबल व पार्किंग प्लाझा कोविड सेंटरचे काम पाहते. लागलीच आयुक्त डॉ. शर्मा यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली. समितीमध्ये उपायुक्त विश्वनाथ केळकर, डॉ. अनिरुद्ध माळगावकर, आरोग्य अधिकारी आणि वर्तकनगर सहायक आयुक्त प्रणाली घोंगे यांचा समावेश असून, तीन दिवसांत चौकशी पूर्ण करण्यास सांगितले आहे.
No comments:
Post a Comment