मुंबई - पवईतील फिल्टरपाडा येथील पालिकेच्या कर्मचारी वसाहतीची काँक्रीटची संरक्षक भिंत बांधण्यासाठी कमी दरात काम करण्यास कंत्राटदाराने तयारी दर्शवली आहे. अशा प्रकारच्या काही कामांचे कमी दराने कंत्राट दिले जात असल्याने कामांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते आहे. बुधवारी होणा-या स्थायी समितीत या प्रस्तावावर वाद रंगण्याची शक्यता आहे.
पालिकेच्या पवई फिल्टरपाडा येथे जल विभागाच्या अंतर्गत पाच कर्मचारी इमारती असून तिथे १९८४ मध्ये बांधलेली दगडी संरक्षक भिंत मोडकळीस आली आहे. तसेच त्या भिंतीची उंचीही कमी असून त्यामुळे तिथे अवैध प्रवेश रोखण्यासाठी तिथे काँक्रीटची भक्कम भिंत, काटेरी तार बांधण्याची योजना आहे. त्या कामांसाठी पालिकेने ४ कोटी ४१ लाख रुपयांचे कार्यालयीन अंदाजपत्रक तयार केले होते. प्रत्यक्षात ही कामे करण्यासाठी ११ कंत्राटदारांपैकी केवळ एकाचा अपवाद वगळता इतर १० कंत्राटदारांनी कमी रक्कमेची निविदा सादर केल्या आहेत. त्यात, उणे ३०.६९ टक्के इतक्या सर्वाधिक कमी दराने काम करण्यास कंत्राटदाराने तयारी दर्शविली आहे. त्यामुळे, पालिकेच्या अंदाजित खर्चापेक्षा ही रक्कम ३ कोटी ०५ लाखांपर्यंत गेली आहे. त्यात इतर कर आदी रक्कम धरुन ही रक्कम ३ कोटी ८७ लाखांवर जाणार आहे. कंत्रादारांकडून वारंवार अंदाजित रकमेपेक्षा कमी दरात निविदा सादर होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे कामांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित होते आहे. याबाबतचा प्रस्ताव बुधवारी होणा-या स्थायी समिती बैठकीत मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे.
No comments:
Post a Comment