नवी दिल्ली : वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) परिषदेची ४४वी बैठक शनिवारी नवी दिल्लीत झाली. यात म्युकरमायकोसिसवरील सर्व औषधे करमुक्त करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. तर अॅम्ब्युलन्सवरील जीएसटी २८ टक्क्यांवरून आता १२ टक्क्यांवर आणण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. तथापि, कोरोना लसीवरील जीएसटी कायम राहणार या बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत दिली. कोरोना संबंधीच्या उपकरणांवरील जीएसटी देखील कमी करण्यात आला आहे. जीएसटीचे जारी करण्यात आलेले हे दर ३० सप्टेंबरपर्यंत लागू राहतील.
कोरोना लसीवरील जीएसटी माफ करण्याच्या मागणीने जोर धरला होता. पण जीएसटी परिषदेने लसीवरील जीएसटी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना लसीवर ५ टक्के जीएसटी लागू राहणार आहे. तर दुसरीकडे, हॅण्ड सॅनिटायझर, टेंपरेचर चेक इक्विपमेंट यावरील जीएसटी दरातही कपात करण्यात आली असून ते पाच टक्के करण्यात आले आहे.
कोरोना रुग्णावर उपचारासाठी महत्वाचे ठरत असलेल्या रेमडेसिवीरवरील जीएसटीमध्येही मोठी कपात करण्यात आली आहे. रेमडेसिवीरवरील जीएसटी आता ५ टक्के इतका करण्यात आला आहे. याआधी रेमडेसिवीरवर १२ टक्के जीएसटी आकारण्यात येत होता.
अॅम्ब्युलन्सवरील जीएसटी २८ टक्क्यांवरून १२ टक्क्यांवर आणण्यात आला आहे. ‘कोरोना संकटात अॅम्ब्युलन्स सेवांनी लोकांचे प्राण वाचवण्यात मोलाची भूमिका बजावली होती. त्यामुळे त्यावरील जीएसटीत कपात करण्यात आल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या. कोरोना संकटादरम्यान अनेक वस्तूंवर १८ टक्के जीएसटी लागत होता. परंतु तो आता ५ टक्के करण्यात आला आहे. अशा अनेक वस्तू होत्या ज्यावर १२ टक्के जीएसटी आकारला जात होता तोदेखील कमी करून ५ टक्के करण्यात आला.
No comments:
Post a Comment