मॅनहोलची पुन्हा तातडीने तपासणी करा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 June 2021

मॅनहोलची पुन्हा तातडीने तपासणी करा



मुंबई - मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व रस्त्यांवरील मॅनहोलची तातडीने आणि नव्याने तपासणी करण्याचे सक्त निर्देश महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी दिले आहेत.

भांडुप (पश्चिम) येथील व्हिलेज रस्त्यावर पूर्वेला असलेल्या एका मॅनहोलचे झाकण बुधवारच्या मुसळधार पावसाप्रसंगी निघाल्याची आणि त्यामुळे दोन महिला त्यात पडल्याचे व्हीडिओ वायरल झाल्यानंतर मुंबई महापालिका अॅक्शन मोडमध्ये आली आहे.

पावसाळापूर्व कामाचा भाग म्हणून सर्व ठिकाणच्या मॅनहोलची तपासणी करून आवश्यक ती दुरुस्ती करण्यात येते. असे असले तरी, बुधवारच्या जोरदार पावसानंतर आणि पाण्याचा निचरा झाल्यानंतर महानगरपालिकेच्या वतीने पुन्हा एकदा सर्व रस्त्यांची पाहणी करुन मॅनहोलची तपासणी केली जात आहे. आवश्यक तेथील मॅनहोल बदलण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. तसे सक्त निर्देश महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी संबंधित विभागांना दिले आहेत.

आधुनिक कुलूपबंद पद्धतीने झाकणे बसवा : महापौर
आधुनिक कुलूपबंद (लॉक अँड की) पद्धतीने मुंबईच्या रस्त्यांवरील सर्व मॅनहोलची झाकणे बसविण्यात यावीत, असे निर्देश मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांनी महानगरपालिका प्रशासनाला दिले आहेत. भांडुप (पश्चिम) येथील व्हिलेज रस्त्यावर पूर्वेला असलेल्या एका मॅनहोलचे झाकण कालच्या जोरदार पावसाप्रसंगी निघाल्याची आणि त्यामुळे दोन महिला त्यात पडताना वाचल्याची घटना घडली. या घटनेची महापौर किशोरी पेडणेकर यांनी गंभीरतेने दखल घेऊन गुरुवारी भांडुप गावातील संबंधित घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. पावसाच्या साचलेल्या पाण्याच्या दाबामुळे फुटपाथवरील वॉटर टेबल फ्रेममधील एफआरपी प्रकारातील मॅनहोल झाकण निखळले. ही बाब धोकादायक असून यामुळे सदरची घटना घडल्याचे महापौरांनी स्पष्ट केले. भांडुपमधील घटनेनंतर महापौर किशोरी पेडणेकर यांनी हे निर्देश दिले आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad