मुंबई - मुंबईत कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आली आहे. मात्र तिसऱ्या लाटेची शक्यता आणि पावसाळी आजारांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका सज्ज झाली आहे. पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यू,एच १ एन १ यांसारखे आजार डोके वर काढू लागले आहेत. त्यामुळे कोविडसह पावसाळी आजारांची चाचणी सक्तीची करण्यात आली आहे.
पावसाळा असेपर्यंत या चाचण्या करण्यात येणार आहेत.कोविडचा संसर्ग नियंत्रणात आला असला धोका अद्याप कायम आहे. तसेच तिस-य़ा लाटेच्या शक्यतेने पालिकेने कंबर कसली आहे. त्यात पावसाळी आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठीही पालिकेची यंत्रणा सज्ज आहे. साथीच्या आजारासाठी खाटा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोरोनासह नॉन कोविड रुग्णांची गैरसोय होऊ नये याकडेही पालिकेने लक्ष वेधले आहे.
सायन रुग्णालयात कोविड आणि नॉन कोविड अशा रुग्णांसोबत साथीच्या आजारांसाठीही व्यवस्था केली आहे. नायरमध्येही साथीच्या आजारासाठी ३०० बेड आरक्षित ठेवण्यात आले असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. नागरिकांनी साथीच्या आजारांकडे दुर्लक्ष करू नये. घरगुती औषधोपचार टाळावेत आणि तपासणीसाठी रुग्णालयात जावे, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.
No comments:
Post a Comment