मुंबई - मुंबईत दुस-या लाटेत झपाट्याने वाढलेल्या कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आहे. तब्बल ११ हजारावर गेलेली कोरोना रुग्णांची संख्या आता हजारच्या आत सातशे ते साडेपाचशेपर्यंत स्थिर राहिली आहे. रुग्ण संख्या कमी झाल्याने रुग्ण दुपटीच्या कालावधीतही वाढ होत आहे. ५ मे रोजी १२३ दिवसांवर असलेला रुग्ण दुपटीचा कालावधी ७२० दिवसांवर पोहचला आहे. त्यामुळे मुंबईत कोरोनाच्या दुस-या लाटेवर नियंत्रण आले आहे.
मुंबईत फेब्रुवारीच्या मध्यानंतर कोरोनाच्या दुस-य़ा लाटेत रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने पालिकेच्या आरोग्यसेवेवर ताण आला होता. खाटा, ऑक्सिजन, वेंटिलेटरचा तुटवडा भासल्याने रुग्णांचे हाल झाले. मात्र प्रभावी उपाययोजनांमुळे पालिकेला या स्थितीवर नियंत्रण आणण्यात यश आले आहे. रोज ८ ते ११ हजारापर्यंत पोहचलेली रुग्णसंख्या आता हजारच्या खाली नोंद होते आहे. तर दुसरीकडे रुग्ण दुपटीचा कालावधीही वाढतो आहे. दीड महिन्यांत तब्बल ५११ दिवसांवर असलेला रुग्ण दुपटीचा कालावधी ७२० वर गेला आहे.
कोरोना रोखण्यासाठी पालिकेने चाचण्यांचे वाढवलेले प्रमाण, क्लोज कॉन्टॅक्टचा तात्काळ शोध, लॉकड़ाऊनमध्ये निर्बंधांची कठोर अंमलबजावणी तसेच प्रभावी उपाय़योजनांमुळे रुग्णांवर नियंत्रण आले आहे. सोमवारी ५२१ नवीन रुग्णांची नोंद झाली. तर ७ रुग्णांचा मृत्यू झाला. चार महिन्यांतील ही सर्वात कमी रुग्णांची नोंद झाली आहे. रुग्णसंख्या घटत असल्याने मुंबई करांना मोठा दिलासा मिळाला आहे.
No comments:
Post a Comment